चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी तशीच निज कोटरा परत पातली पक्षिणी आमच्या शालेय जीवनात रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची ‘केवढे हे क्रौर्य’ नावाची वरील कविता अभ्यासात होती. ही कविता जेव्हा गुरुजी शिकवायचे तेव्हा त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही डोळ्यात अश्रूंचा पूर यायचा.
पापण्यांच्या इवल्याशा बांधाने तो पूर अडवणे कठीण जात होते. बाण लागलेला असतानाही ती पक्षीण घरट्यातल्या पिलांकडे तशीच, घायाळ अवस्थेत परतली आहे. ‘आपली आई आपल्याला सोडून खुशाल कुठेतरी निघून गेली,’ असं त्यांना वाटेल म्हणून ती धडपडत, तडफडत परत आली आहे. ‘आता देवच तुमचा सांभाळ करील,’ असं म्हणून ती त्यांचा निरोप घेते आहे. माय-लेकरांच्या या संवादाला पूर्णविराम देत कवीने माणसाच्या क्रूर, विनाशक वृत्तीवर भाष्य केले आहे.
राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या १९७१मधील ' हाथी मेरे साथी ' या चित्रपटातील आनंद बक्षी यांचे मो.रफ़ी यांनी गायलेले एक गीत आठवल. आपला जीव वाचवणाऱ्या चार हत्तीवर राजेश खन्नाचा अतिशय जीव असतो. त्यातील एका हत्तीची काही लोकांकडून हत्या केली जाते तेव्हा हे गीत आहे.
नफरत की दुनिया कोछोड़ के खुश रहना मेरे यार! जब जानवर कोई इंसान को मारे कहते हैं दुनिया में वहशी उसे सारे एक जानवर की जान आज इंसानों ने ली है, चुप क्यों है संसार?
नदीकाठच्या झाडावर कामातूर झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील नराला पारधी धराशयी पाडतो तेव्हा मादी पक्षी अरण्यरुदन करीत आसवे गाळते. हे हृदय विदारक दृश्य पाहून वाल्मिकी यांच्या मुखातून पुढील श्लोक निघतो. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शास्वती समा यत्क्रौंचमिथुनादेकमवधी: काममोहितम्।।
अर्थात,हे निषाद ! तुला कधीही शांती मिळणार नाही कारण काममोहीत असलेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील एकाला कोणताही अपराध नसताना त्याची हत्या केली. क्रौर्याच्या या कथा आठवण्याचे कारण जगभरात असे क्रौर्य घडत असताना एक मूक प्रेक्षक बनून बसल्याचे दुःख आहे. जॉर्ज फ्लाईट या आफ्रिकन-अमेरिकी अश्वेत व्यक्तीची श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी डेरेक चोविन यांनी मानेवर पायातील बुट दाबून हत्या केली. जॉर्ज फ्लाईडच्या अमानुष आणि निर्दय हत्येमुळे जो हिंसाचार उफाळलेला आहे तो आटोक्यात आणण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी" दशाची माफी मागितली नाही," उलट "जिथे लूट तिथे शूट "असे शब्द वापरून सांगितले की, हजारो सशस्त्र सैनिक, लष्करी जवान पाठवून आपण दंगल, लुटमार, गुंडगिरी ,हल्ले थांबून दाखवू. या वृत्तीला क्रौर्य याशिवाय दुसरा कोणता शब्द? जॉर्ज फ्राईड च्या हत्येसारखीच घटना राजस्थानातील जोधपुर घडली.
|
प्रा.न.मा.जोशी |
कोरोना काळात मास्क लावला नाही म्हणून मुकेश कुमार प्रजापत नावाच्या तरुणाला पोलिसाने खाली पाडून मानेवर गुडघ्याने प्रहार केले. गणवेशातील पोलिसांवर मुकेश ने हल्ला केला होता असा पोलिसांचा बचाव असला तरी पोलिसांची कृती क्रौर्य सदरातच मोडते. मुकेश अटकेत आहे. आपल्या १०० वर्ष वयाच्या जख्ख म्हाताऱ्या आईला खाटेवर झोपवून ती खाट रस्त्याने ओढत बँकेपर्यंत नेणाऱ्या तिच्यामुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, म्हातारी जीवंत आहे याचे प्रमाण बँकेला हवे होते, म्हातारीला केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला काही लोकांनी फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. त्यानंतर तिच्या तोंडात ते फटाके फुटले. त्यानंतर या असह्य वेदनेसह ती एका नदीत जाऊन उभी राहिली. पण, अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.केवढे हे क्रौर्य? परप्रांतातील स्थलांतरित प्रवासी मजुराचे हाल हाल झाले हे कटू वास्तव असले तरी त्याची सर्व व्यवस्था करण्यात आली होती, त्यांनी पलायन करायला नको होते असे मंत्र्याने म्हणणे किंवा एकही मजूर रस्त्याने पायी जात नाही,असे सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात भारताचे साँली सिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगणे हेही एक क्रौर्यच आहे.
दिल्ली बाहेरील कोरोनाग्रस्त नागरिकांचे दिल्लीतील दवाखान्यात उपचार केल्या जाणार नाहीत अशी भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निर्णय उपराज्यपाल अनिल बैजल यांनी बदलला हे योग्य झाले तरी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे वागणे क्रौर्य या व्याख्येतच बसते.दिल्लीतील रुग्णालयांमध्ये कोरोना संक्रमित आणि त्या आजाराने मरणा-यांच्या मृतदेहांची दुर्गति होत आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.
संक्रमीतांवरील उपचार आणि बेपर्वाई याचे जे वातावरण दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. ते क्रौर्यच म्हटले पाहिजे. ही अवस्था केवळ दिल्लीची आहे असे नाही, अनेक राज्यात आरोग्य व्यवस्थेची अशी खराब अवस्था आहे. काही वार्डात रुग्णांच्या जवळच मृतदेह पडल्याचे दृश्य आहे. शवविच्छेदनगृहात शव ठेवण्याला जगा नाही. कोरोनाने आमच्या आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे, आमची आरोग्य व्यवस्था उध्वस्त झालेली आहे हेही दाखवले आहे.
म्हणायला हजारो खाटांची व्यवस्था केल्याचा दावा होत आहे. स्टेडियम , हॉटेल शाळा, इस्पितळात बदलण्यात आले पण खाटा रिकाम्या असूनही रुग्णांना दाखल केल्या जात नाही. हे क्रौर्य नव्हे काय? उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या राज्यातील मजुरांच्या संदर्भात हीच मानसिकता दाखवली आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. महाराष्ट्रातील मजूर आपल्या गावी जाऊ इच्छित होता त्यांना रस्त्यातच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश च्या सीमेवर रोखण्यात आले. नियोजन शून्य लॉकडाऊनमुळे स्थलांतरित प्रवासी मजुरांच्या झालेल्या हाल-अपेष्टा हे क्रौर्याशिवाय वेगळे काय आहे? नोटाबंदीचा अनर्थकारी निर्णय असो, की ढासळलेली अर्थव्यवस्था असो, की नियोजन शून्य लॉक डाऊनचा निर्णय असो, त्यामुळेमुळे होत असलेले हाल असो की, लोकांची झालेली अन्नान अवस्था असो, रेल्वेखाली, ट्रक खाली , किंवा पायी चालत मरणारे असो की रस्त्यात कुणाची प्रसूती झालेली असो. संविधानाच्या कलम २१ ची व्यापक व्याख्या करताना सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचा विस्ताराने ऊहापोह केला आहे.
त्यात म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकाला गुराढोरां सारखे नव्हे तर प्रतिष्ठा पूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे . प्रत्येकाला उत्तमोत्तम आरोग्य सेवा याचाही विचार केला आहे.वास्तव काय आहे? आपल्या जीडीपीच्या केवळ १.२८ टक्के आरोग्यावर खर्च केला जातो. भूतान, बांगलादेश, मालदीव सारखे लहान देश देखील यापेक्षा अधिक खर्च करतात. संविधानातील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी आम्ही करू शकलो नाही हे क्रौर्य नव्हे तर दुसरे काय? जळगाव जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात कोरोना बाधित एका ८२ वर्षीय वृद्धमहिलेचा मृतदेह आठ दिवस पर्यंत शौचालयात पडून असलेला आढळला. कमालीच्या संवेदनहीनतेचे याशिवाय दूसरे आणखी उदाहरण कोणते हवे? विज्ञानाने अफाट प्रगती केली असेल पण प्रत्येक माणसाच्या मनातील करुणा आणि मानवतेचा झरा कायमचा प्रवाहित कसा राहील याबाबत मात्र ते हतबल बोल झालेले दिसते.करुणा आणि मानवतेच्या अभावी निर्माण झालेले क्रौर्य संपवणे काळाची गरज आहे,ती कशी पूर्ण होणार हा चिंतेचा विषय आहे एवढे मात्र खरे.
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत. 8805948951
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response