Breaking

Post Top Ad

मंगळवार, ७ जुलै, २०२०

बचत गटातील अतिगरीब महिलांना ७१ लाखांचे धनादेश वाटप


बचत गटातील अतिगरीब महिलांना ७१ लाखांचे धनादेश वाटप
समाजातील सर्वात महत्वाच्या घटकासाठी महिला व बालविकास विभाग काम करीत आहे. गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान मुलांना योग्य आहार मिळाला तर आपण कुपोषणावर नक्कीच मात करू शकतो. त्यामुळे या घटकाला अंगणवाडीतून उत्कृष्ट पोषण आहार देणे, हाच विभागाचा मूळ उद्देश आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे, बांधकाम सभापती राम देवसरकर, जि. प. सदस्या स्वाती येंडे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, माविमचे प्रमुख डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात विभागातर्फे घरपोच पोषण आहार देण्यात आला, असे सांगून ॲङ ठाकूर म्हणाल्या, आहाराच्या जागेवर निधी दिला तर खरच त्या पैशातून संबंधित लाभार्थी तसा आहार घेतात का, हे पाहणे गरजेचे आहे. पोषण आहाराच्या वितरणामध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका. महिला व बालकल्याण विभागासाठी दरवर्षी नियोजन समितीमधून एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी अंगणवाडी सुधार व बांधकामाकरीता वापरता येईल. यवतमाळ जिल्ह्यात कुमारी मातांचे प्रमाण जास्त आहे. २०१२ मध्ये कुमारी मातांच्या पुनर्वसनासाठी जागा देण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, सदर प्रस्ताव कुठे थांबला आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली असता या प्रकल्पांतर्गत पाच एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या जागेवर आधारगृहाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 

यावर मंत्री महोदय म्हणाल्या, येथे आधारगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करू. एक स्त्री सर्व कुटुंबाला शिकविते. त्यामुळे शाळा सोडलेल्या मुलींचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. कोणतेही मूल अनाथ राहू नये, यासाठी मुलांचे संरक्षण, निवारा गृहे याबाबत नियोजन करण्यात येईल. महिला व बालविकास विभागाचे जिल्ह्यात चांगले काम आहे. उद्योजकांच्या सीएसआर फंड या विभागाच्या कामासाठी वापरावा. यातून अंगणवाडी डीजीटल करणे, अर्धवट अंगणवाडी बांधकाम पूर्ण करणे, महिला व बालकल्याण भवन निर्माण करणे आदी कामे अधिका-यांनी करून घ्यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी माविमच्या बचत गटातर्फे लावण्यात आलेल्या प्रदर्शनीची पाहणी केली. 

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे बचत गटातील अतिगरीब महिलांना ७१ लाखांच्या धनादेशाचे वाटप ॲङ यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यात आर्णी तालुक्यातील तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राला १५ लक्ष १६ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुसद येथील लोकसंचालीत साधन केंद्र १२ लक्ष ७३ हजार, उमरखेड येथील लोकसंचालीत साधन केंद्र ९ लक्ष १४ हजार, मारेगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालीत केंद्र १२ लक्ष ४४ हजार रुपये, पांढरकवडा येथील लोकसंचालीत साधन केंद्र १२ लक्ष ३७ हजार  आणि कळंब येथील प्रगती लोकसंचालीत साधन केंद्राला 9 लक्ष 14 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या ग्रामीण, नागरी व राज्य पातळीवरील कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच तालुक्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad