Breaking

Post Top Ad

रविवार, ५ जुलै, २०२०

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहचवा- कृषीमंत्री भुसे

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहचवा- कृषीमंत्री भुसे
कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात हरित क्रांतीचे प्रणते माजी  मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१ जुलै पासून कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचवा, अशा सुचना कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

यवतमाळ जिल्हातील मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांची शेतीशाळा व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, माजी आमदार विश्वास नांदेकर, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान कृषी विभागाच्या अधिकारी - कर्मचा-यांनी शेतक-यांच्या बांधापर्यंत जावून शेतक-यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून कृषीमंत्री भुसे म्हणाले, येणाऱ्या दिवसात शेतीतील शारीरिक कष्टाची कामे तांत्रिक पद्धतीने कसे करावे, याविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच फवारणी यंत्र कोणते वापरावे, त्याचे नोझल कोणते वापरावे, रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, विषबाधाच्या दुर्घटना कशा थांबवता येईल, या सर्व बाबींचेसुध्दा प्रशिक्षण शेतक-यांना दिले जाईल. बियाणे उगवण शक्तीचा प्रयोग केला होता का, तो कसा केला, तुम्ही केलेल्या प्रयोगातून नवीन काही शिकायला मिळाले का, इतरांनी काय सुधारणा कराव्या आदी माहिती आदी माहिती कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. 

शेतीशाळा प्रशिक्षणामुळे जे शिकायला मिळाले ती माहिती गावातील इतर महिलांनाही द्या. तसेच कृषी विभागातर्फे होणा-या मार्गदर्शानाचा तळागाळातील शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, वनमंत्री संजय राठोड यांनी हटवांजरी येथे महिलांच्या शेतीशाळेत प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. फुल नांगरणीचे फायदे काय, वखरणी, बियाण्याची निवड कशी करावी, याबाबत देखील त्यांनी महिला शेतकऱ्यांना विचारणा केली. यावेळी निंबोळ्यापासून खत बनवण्याचे प्रात्यक्षिक मंत्री महोदयांना प्रदर्शनीत दाखवण्यात आले. बांबूपासून तयार करण्यात आलेले साहित्य देखील प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad