Breaking

Post Top Ad

सोमवार, १३ जुलै, २०२०

कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक धोरण राबवा; ना.संजय राठोड


कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक धोरण राबवा; ना.संजय राठोड
यवतमाळ जिल्ह्यात गत आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण जेवढे रुग्ण आहेत, त्यापैकी ५० टक्के रुग्णांची भर केवळ १० ते १२ दिवसात पडली आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर यवतमाळ जिल्ह्याची परिस्थितीसुध्दा आजुबाजूच्या जिल्ह्याप्रमाणे होईल. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण राबवावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांनी अत्यंत तातडीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार सर्वश्री डॉ. वजाहत मिर्झा, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकूरवार, नामदेव ससाणे, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दारव्हाचे नगराध्यक्ष बबन इरवे, पांढरकवडाच्या नगराध्यक्षा वैशाली नहाते, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा कोरोनाच्या रडारवर आले असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांचा हा निष्काळजीपणा स्वत:च्या तसेच दुस-यांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रशासनाने कडक भुमिका घेणे आता अपरिहार्य आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांसाठी अहोरात्र झटत असून नागरिकांनी व सर्व लोकप्रतिनिधींनी संकटाच्या यावेळी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे. 

थोडे कडक धोरण अवलंबिले तर जिल्ह्यात आपण पुर्ववत स्थिती निर्माण करू शकतो, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री पुढे म्हणाले, पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करावी. तसेच तालुक्यातील अंतर्गत वाहतुकीवरसुध्दा निर्बंध घालावे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटस्पॉटसाठी संबंधित पालिका क्षेत्रनिहाय नियोजन करावे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही वाढत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून सुक्ष्म नियोजन करावे. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचे ऑपरेशन असेल तर त्याला कोव्हीडची तपासणी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या नमुन्याची चाचणी वैद्यकीय महाविद्यालयाने त्वरीत करून द्यावी. जेणेकरून संबंधित व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. दुकानांची वेळ कमी करण्याबाबत तसेच बाजारात किंवा दुकानात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. दुकानांसाठी प्रशासनाने ठरवून दिलेली ठराविक वेळ वगळता इतर वेळी अनावश्यकपणे बाहेर फिरणा-या व्यक्तिंविरुध्द पोलिसांनी कडक भुमिका घ्यावी, अशाही सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सादरीकरण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad