Breaking

Post Top Ad

बुधवार, २९ जुलै, २०२०

'महिला व्यवसायिकांना चालना देण्यासाठी उद्योग विकास केंद्र सुरू'

'महिला व्यवसायिकांना चालना देण्यासाठी उद्योग विकास केंद्र सुरू'
यवतमाळ:  महिला स्वयंसहायता समूहामार्फत चालविल्या जाणाऱ्या छोट्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याकरीता कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, केळापूर व झरीजामणी या सहा तालुक्यात उद्योग विकास केंद्र (One Stop Facility Center) स्थापन करण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या उपक्रमास शुभेच्या दिल्या आहेत.

वरील सहा तालुक्यातील उद्योग विकास केंद्राचे ई-उद्घाटन उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक राजेश कुलकर्णी, कृतीसंगमचे उपसंचालक दादा गुंजाळ,  राज्य व्यवस्थापक स्नेहल विचारे, जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, सर्व उद्योग विकास केंद्राचे नोडल प्रभागसंघ व इतर प्रभाग संघ पदाधिकारी आणि इतर तालुक्यातील प्रमुख मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ७ वर्षापासून महिलांच्या उन्नतीकरिता कार्यरत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात महिलांचे समूह तयार करून त्यांना व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यात येते. त्यामुळे महिला सक्षम होऊन त्यांनी विविध व्यवसाय सुरु केले आणि स्वतःच्या उपजीविका स्वतः निर्माण केल्या आहेत.

गावातच लोकांना या केंद्रामार्फत नवीन उद्योग व्यवसाय आराखडा तयार करणे, व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, भांडवल सुलभीकरण करणे, बँकेकडून वित्त पुरवठा करण्यास सहकार्य करणे, बाजारपेठ उपलब्ध करून जोडणी करणे, विविध उद्योगाबाबत कायदेविषयक मार्गदर्शन देणे, नवीन तंत्रज्ञान व कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे इत्यादी प्रकारच्या सेवा या केंद्रामार्फत देण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, पंचायत समिती सभापती तोडसाम (केळापूर), रोशनी ताडाम (बाभूळगाव), गट विकास अधिकारी रमेश दोडके, सुशील संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल ठाकूर, सीडीपीओ श्री. वामन, संसाधन व्यक्ती आणि संपूर्ण तालुका अभियान व्यवस्थापनचे अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad