Breaking

Post Top Ad

सोमवार, २० जुलै, २०२०

'चंद्रपुर मध्ये लाॅकडाऊन कायम'

'चंद्रपुर मध्ये लाॅकडाऊन कायम'
चंद्रपूर शहरांमध्ये तसेच ऊर्जानगर व दुर्गापुर येथे १७ जुलै ते २६ जुलै पर्यंत लॉकडाऊन केलेले आहे. या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा २१ जुलै पासून सुरू होत आहे. लॉकडाऊनमध्ये कोणतेही शिथीलता देण्यात आली नसून फक्त त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहे. २१ जुलैपासून फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेतच सुरू राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

ही दुकाने व आस्थापने सुरू राहतील
२१ जुलै ते २६ जुलै या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते जसे खाद्यपदार्थ, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळे-भाजीपाला, अंडी, मांस, मासे, विक्री, पशुखाद्य, कृषिविषयक आस्थापना यांची दुकाने सुरू राहतील. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद राहतील.
झोमॅटो, स्विगी, डॉमिनोज व तत्सम ऑनलाइन पोर्टलवरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ, पुरवठा सेवा तसेच हॉटेल, रेस्टॉरंट यांचेमार्फत देण्यात येणारी घरपोच सेवा २१ जुलै सकाळी ९ वाजेनंतर देऊ शकतील. ही सेवा रात्री ९ वाजेपर्यंतच असणार आहे. सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे अडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार फेरीवाले हे सर्व सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. मांस,मासे, चिकन, अंडी, इत्यादींची विक्री सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील. परंतु वैद्यकीय कारणास्तव प्रवासाकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपूर यांच्याकडून ई पास उपलब्ध करून घेण्यात यावे.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतील एसटी बस ही अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी व परवानगी प्राप्त उद्योगातील अधिकृत कर्मचारी यांच्या करिता सुरू राहील. ई-कॉमर्स सेवा उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व या सारख्या तत्सम सेवा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यासाठी सुरू राहतील. घरपोच दुधाचे वितरण सकाळी ६ ते १० या कालावधीत अनुज्ञेय राहील. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशू चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेत सुरू राहतील. सर्व रुग्णालय, औषधालय तसेच रुग्णालयाची निगडीत सेवा, आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना अत्यावश्यक सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधित रूग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील.

सर्व मेडिकल दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. तथापि ऑनलाईन औषध वितरण सेवा व रुग्णालय संलग्न औषधांची दुकाने २४ तास सुरू राहील. सर्व न्यायालय व राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरू राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे अत्यावश्यक राहील. पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहतील. एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरू राहील. निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरू राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजिटल, प्रिंट मिडिया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरू राहतील. वर्तमानपत्र वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील.

सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी, एलआयसी कार्यालय, किमान मनुष्यबळासह सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील. बँकेच्या इतर ग्राहक सेवा उदाहरणार्थ ऑनलाईन, एटीएम इत्यादी सुरू राहतील. एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील सध्या चालू असलेले सर्व औद्योगिक आस्थापना पूर्ववत सुरू करता येतील. तसेच या आस्थापनातील कर्मचारी कामगार यांना कामावर जाण्यासाठी व परतीसाठी कंपनीकडील, आस्थापनाकडील ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहील. यासाठी परवानगी देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दोन चाकी (एक व्यक्तीस) व चारचाकी वाहन (तीन व्यक्तीस- चालकासह) किंवा कंपनीने प्राधिकृत केलेली प्रवासी बस ५० टक्के क्षमतेने वापरण्यास परवानगी राहील. ही आस्थापना संपूर्णत: बंद राहतील:
उपहारगृह, लॉज, हॉटेल, रीसोर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत: बंद राहतील. सार्वजनिक-खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉक करणेस संपूर्णत: प्रतिबंध राहील. सर्व केश कर्तनालय, सलून, स्पा, ब्युटीपार्लर दुकाने संपूर्णत: बंद राहतील.  

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील. सार्वजनिक व खासगी प्रवासी दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने बंद राहतील.
सर्व प्रकारची खाजगी बांधकाम, कंट्रक्शनची कामे संपूर्णत: बंद राहतील.तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल तसेच शासनाची शासकीय कामे सुरू राहतील. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र, प्रेक्षागृह, सभागृह संपूर्णत: बंद राहतील. सर्व प्रकारचे मंगल कार्यालय लॉन, हॉल तसेच लग्नसमारंभ, स्वागत समारंभ बंद राहील. खासगी आस्थापना कार्यालये संपूर्णत: बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सभा संपूर्णत: बंद राहतील. सदर आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad