Post Top Ad
सोमवार, ६ जुलै, २०२०
सोयाबीन बियाणे उगवण तक्रारींबाबत गंभीर दखल-कृषीमंत्री भुसे
यवतमाळ :- राज्यात तसेच जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा हा आकडा राज्यात ३० हजारांच्या जवळपास असून यापैकी ५० ते ६० टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी बियाणे उगवण संदर्भातील तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यात दोषी असलेल्या कंपन्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असा विश्वास राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी शेतक-यांना दिला. कळंब तालुक्यातील शिवपुरी येथे कृषी संजीवनी सप्ताहअंतर्गत शेतकरी संवाद, रोप वाटप व प्रगतशील शेतक-यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजू राठोड, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, दुलिचंद राठोड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
हरीतक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने १ ते ७ जुलै हा राज्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले, असे सांगून कृषीमंत्री म्हणाले, ज्या कंपन्याचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाचे महामंडळ असलेल्या महाबीजच्या बियाणांबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र महाबीजतर्फे शेतक-यांना बियाणे बदलवून देण्यात येत आहे. तरीसुध्दा तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येईल. कपाशीच्या बीटी-३ वाणाला परवानगी देण्याची मागणी शेतक-यांनी केली असता कृषीमंत्री म्हणाले, कापूस बीटी-3 हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या वाणाचा पर्यावरणीयदृष्ट्या काय परिणाम होतो, याबाबत संशोधन सुरू आहे. कपाशीच्या या वाणाला केंद्राच्या आदेशानुसारच परवानगी देता येते.
शेतक-यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळून तो चिंतामुक्त झाला पाहिजे, यासाठी शासन कटिबध्द आहे. वसंतराव नाईक यांनी हरीतक्रांतीच्या मार्गाने आपली वाटचाल करून दिली. भविष्यात सोयाबीन आणि कापूस संदर्भात योग्य मार्गक्रमण करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. शेतक-यांच्या बांधावर जाऊन अनुभव घेणे, त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे, नवीन तंत्रज्ञानाबाबत त्यांना अवगत करणे, शेतक-यांच्या सुचनांवर अंमल करणे यादृष्टीने कृषी विभाग काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. वनमंत्री यांचे वडील दुलिचंद राठोड यांचा ७ जुलै रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा कृषीमंत्र्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डोंगरखर्डा येथील निश्चल ठाकरे, पालोती येथील रियाज मदतअली भानवडीया, मेटीखेडा येथील नरेंद्र जयस्वाल, कळंब येथील विठ्ठल फाळके या प्रगतशील शेतक-यांचा सत्कार तसेच बाबाराव टेकाम, रणजीत मडावी, प्रवीण कन्नाके आदींना किटकनाशक फवारणी कीट देण्यात आली. गावातील हेमंत चुनारकर याने तयार केलेले डवरणी, खत पेरणी, किटकनाशक फवारणी यंत्राची दोन्ही मंत्र्यांनी पाहणी केली.
तत्पूर्वी दोन्ही मंत्र्यांनी मंदिरात जाऊन जगदंबा देवीचे दर्शन घेतले. तसेच वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे संचालन जि.प.सदस्य गजानन बेजनकीवार यांनी केले. यावेळी राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. प्रमोद यादगीरवार, शास्त्रज्ञ सुरेश नेमाडे, सभापती पुजा शेळके, सरपंच देविदास मेश्राम, तालुका कृषी अधिकारी प्रतिभा कुताळ आदी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response