Breaking

Post Top Ad

शनिवार, ११ जुलै, २०२०

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या - प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या - प्रकाश आंबेडकर
समुद्रात मासेमारी  करणाऱ्यांपेक्षा राज्यातील तलाव, धरण व नदीवर मासेमारी करणाऱ्या लोकांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे लिलाव पद्धत बंद करून मच्छिमार बांधवांना मासेमारीचे थेट ठेके देण्यात यावे, त्याचबरोबर कुंभार, सुतार, लोहार समाजाच्या लोकांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली. या दोन्ही मागण्या  मान्य केल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
  
दुपारी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत या मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील तलाव, धरण परिसर, नदी व इतर ठिकाणी मासेमारी करणारा मच्छीमार समाज सध्या आर्थिक संकटातून जात आहे.  राज्यात बोगस सर्टिफिकेट तयार करून मच्छिमार सोसायट्या रजिस्ट्रेशन करण्यात आल्या व त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिलावात भाग घेऊन मच्छिमारी चे ठेके घेतले. 

परिणामी खरा मच्छीमार बांधव हा गरिबीमुळे लिलाव प्रक्रिये पासून दूर गेला. त्यामुळे ही लिलाव पद्धत बंद करण्यात यावी, तसेच मच्छीमारी सोसायट्यांवर अध्यक्ष, सचिव व खजिनदार हे याच समाजातील  असावे, अशांनाच लिलाव न करता थेट टेंडर काढून मच्छीमारीचे ठेके देण्यात यावे, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून आम्ही  सरकारी आदेशाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
त्याचबरोबर कुंभार सुतार,लोहार हा समाज घरगुती उद्योग करून आपले आयुष्य जगतोय. त्यांना बँकांकडून मदत मिळत नाही. अश्या घरगुती उद्योग  करणाऱ्या लोकांची जिल्हाधिकारी मार्फत यादी तयार करण्यात यावी व त्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे,  अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी चर्चेदरम्यान केली. अनुदानापोटी ५० कोटीच्या आत खर्च येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आली. या मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून  याबाबत ते कधी आदेश काढतात याची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad