Breaking

Post Top Ad

शनिवार, ४ जुलै, २०२०

भ्रष्टाचार करणाऱ्या महासंचालकाला सरकारचे अभय ?

मुंबई-मराठा, कुणबी, बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उद्धाराकरिता दोन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आली होती. या दोन्ही संस्थेमध्ये एकाच अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला असून कोणतेही सरकार या अधिकाऱ्यावर  कारवाई करीत नसल्याचा आरोप  राज्यसभा खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले  यांनी आज येथे केला. महासंचालक डी आर परिहार दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही खासदार संभाजीराजे यांनी केली. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली.

बहुजन समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्था अर्थात 'सारथी' ची स्थापना करण्यात आली होती. २०१८ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचे कामकाज सुरवातीपासूनच निधी अभावी रेंगाळत गेले. वर्षपूर्ती पूर्वीच संस्थेचे महासंचालक डी. आर. परिहार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केला. या भ्रष्टाचाराचे काय झाले, चौकशी झाली की नाही, बहुजन समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत उपमुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा व बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली. 

कथित भ्रष्टाचार करणारा अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण अर्थात बार्टीचे महासंचालक म्हणून कार्यरत असताना, अधिकाऱ्यांची नियुक्ती व बडतर्फी हे प्रकरण परिहार यांनी गाजवले. अधिकाऱ्यांना मेल द्वारे तर त्यांच्या घरावर बडतर्फीची नोटीस लावून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. अगोदर गरज असल्याचे सांगत, वृत्तपत्रात जाहिरात करून या अधिकाऱ्यांना अकरा महिन्यांसाठी सेवेत सामावून घेतले व काही महिन्यातच गरज नसल्याचे कारण सांगत या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बडतर्फ करण्यात आले. या अनियमिततेमुळे अनेक तक्रारी  तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे आल्या होत्या. मात्र कारवाई झाली नाही.  परिहार यांनी एका संस्थेत भ्रष्टाचार केलेला असताना त्यांना पुन्हा दुसऱ्या संस्थेत महासंचालक पदी नियुक्त का करण्यात आले असा प्रश्न राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला.

दोन्ही संस्थेत डी आर परिहार यांनी भ्रष्टाचार केलेला असतानाही दोन्ही सरकारांनी परिहार यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे ही सरकारे मराठा-कुणबी बहुजन समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला. युती आणि आताचे महाआघाडी सरकार परिहार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी का करीत नाही, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. अजून किती वर्षे मराठा, कुणबी,बहुजन समाजाची फसवणूक करणार आहात असा सवालही पातोडे यांनी उपस्थित केला. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad