जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पर्जन्य आधारीत असुन ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू पीकाखाली आहे. कधी अवर्षण तर कधी अतीवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येते. या सर्व बाबींचा विचार करुन शासनाने खरीप २०२० व रब्बी २०२०-२१- हंगामा पासुन तीन वर्षाकरिता राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत दिनांक ३१ जुलै २०२० आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे. अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे ( कुळाने अगर भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शासनामार्फत नेमणूक करण्यात आली आहे.
योजने अंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम पुढील प्रमाणे आहे. भात(तांदुळ) या पिकासाठी ४२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांनी ८५० रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा आहे. ज्वारी पिकासाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर विमा संरक्षीत रक्कम असून शेतकऱ्यांनी 500 रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा आहे.सोयाबिन पिकासाठी ४५ हजार रुपये प्रतिहेक्टर विमा संरक्षीत रक्कम असून शेतकऱ्यांनी ९०० रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा आहे.
मुग व उडीद पिकासाठी २० हजार रुपये प्रतिहेक्टर विमा संरक्षीत रक्कम असून शेतकऱ्यांनी ४०० रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा आहे.तूर पिकासाठी ३५ हजार रुपये प्रतिहेक्टर विमा संरक्षीत रक्कम असून शेतकऱ्यांनी ७०० रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा आहे.कापूस पिकासाठी ४५ हजार रुपये प्रतिहेक्टर विमा संरक्षीत रक्कम असून शेतकऱ्यांनी २ हजार २५० रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा आहे. खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा,न होण्याचा पर्याय या तत्वावर कार्यरत आहे.योजनेत सहभागी होणे बाबत अथवा न होणे बाबत शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड खाते आहे.अथवा ज्या बँकेकडून पिक कर्ज घेतले आहे. त्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करणे अपेक्षित आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणेसाठी व न होणेसाठी स्वतंत्र अर्ज असावेत.कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हावे किंवा नाही या बाबत निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर २४ जुलै पुर्वी देणे अपेक्षित आहे. जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणा पत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळणेस्तवः प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जुलै २०२० या पूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response