Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

'या शहरात आजपासून लॉकडाऊन नाही'

'या शहरात आजपासून लॉकडाऊन नाही'

चंद्रपूर महानगर क्षेत्र व दोन ग्रामपंचायती परिसरात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ( लॉकडाऊन) रुग्ण संख्येमध्ये घट दिसून आली. या काळात नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी १७ ते २६ जुलैपर्यंत लावलेली टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन शनिवार दि. २५ जुलै पासून उठवत असल्याचे जाहीर केले. नागरिकांनी यापुढे देखील शारीरिक अंतर राखावे, मास्कचा वापर करावा व बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३४९ झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या १३ बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाच, गडचांदूर तालुक्यातील एक, चंद्रपूर महानगर क्षेत्रातील दोन व चिमूर येथील चार बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलबोडी येथील एका बाधिताचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधित ३४९ झाले आहेत. यापैकी २१४ बरे झाले असून १३५ बाधितांवर उपचार सुरु आहेत.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, ऊर्जानगर व दुर्गापुर या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये दि. १७ जुलै ते २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले होते. शासनातर्फे लॉकडाऊनचे आदेश तसेच अतिरिक्त निर्बंध या क्षेत्रात घोषित केले होते. त्याचा गेल्या काही दिवसात चांगला परिणाम दिसून आलेला आहे. रुग्ण संख्येत घट आली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन २५ जुलै रोजी उठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून जे  लॉकडाऊनचे अतिरिक्त निर्बंध आहेत. ते उठविण्यात येत आहेत. लॉकडाऊन उठवत असताना पूर्वी ७ वाजेपर्यंत जी आस्थापना उघडण्याची वेळ होती. ती कमी करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या आस्थापनांना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र बाजारपेठेत लोकांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, बंधनकारक राहील.

प्रत्येक दुकानांमध्ये सॅनीटायजर किंवा हॅन्ड वॅाशची सुविधा असणे बंधनकारक राहील. ज्या बाजारपेठेत वा दुकानात हे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापना व दुकाने बंद करण्याचे संपूर्ण अधिकार प्रशासनास असेल. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात अतिशय कल्पकतेने व प्रभावीपणे मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी केलेली आहे. तसेच पहिले ४ दिवस आपल्याकडे संपूर्णपणे बाजारपेठ आणि दुकाने बंद होती. त्यानंतरही केवळ सकाळी ९  ते २ या कालावधीपुरतेच अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंसाठी दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे, याचा चांगला परिणाम दिसून आलेला आहे. त्याच्यामध्ये सातत्य रहावे यासाठी जी काळजी आपण लॉकडाऊनमध्ये घेतली तीच काळजी या काळातही घ्यावी, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad