Breaking

Post Top Ad

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

"वैधकिय महाविद्यालयातील तक्रारींची दखल घेणार";जिल्हाधिकारी

वैधकिय महाविद्यालयातील तक्रारींची दखल घेणार;जिल्हाधिकारी

यवतमाळ, दि. ४ ऑगस्ट  : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार होत असून याबाबत कोणाचीही तक्रार नाही. त्यामुळे आतापर्यंत ७०० च्या वर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र येथे असलेल्या सुविधांबाबत काही तक्रार असेल तर त्या प्राधान्याने सोडविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पत्रकांराना सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांकडून निवेदन स्वीकारतांना ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे व पत्रकार उपस्थित होते.

गत सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासनातील प्रत्येक अधिकारी तसेच आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात भरती होणा-या कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करून घरी पाठविणे, हे एकच ध्येय आहे. तरीसुध्दा काही रुग्णांच्या येथील व्यवस्थेबाबत तक्रारी असेल तर प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच रुग्णांशी असभ्य वागणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

येथील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी नि:स्पक्ष त्रिपक्षीय समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीचे अध्यक्ष जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार असून इतरही खाजगी डॉक्टरांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुविधा सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार होम आयसोलेशन जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून होम आयसोलेशनकरीता घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र वॉशरुम व कोणाच्याही संपर्कात न येणासारख्या गोष्टींची पुर्तता असणे आवश्यक राहील. मात्र पहिले दोन दिवस संबंधित रुग्णाचा ताप, सर्दी, खोकला, एसपीओटू आदी शासकीय आरोग्य यंत्रणेत तपासले जाईल. त्यानंतरच आवश्यकता वाटली तर अशा रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा देण्यात येईल.

तसेच रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचीसुध्दा सुविधा देण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा खर्च संबंधित रुग्णाने करणे आवश्यक आहे. दुस-या जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात जायचे असेल तर संबंधित रुग्णालयाची सर्व सविस्तर माहिती प्रशासनाला सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात दोन खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात कोव्हीड रुग्णालय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. सर्व बाबींची तपासणी करून त्यांना परवानगी देण्यात येईल.

तसेच पालकमंत्री संजय राठोड यांनी उपलब्ध करून दिलेल्या दोन कोटी रुपयांमधून जिल्ह्याला ३० हजार ॲन्टीजन टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. पुसद, पांढरकवडा, यवतमाळ आणि दिग्रस येथे प्रत्येकी तीन हजार किटचे वाटप करण्यात येणार आहे. तर उर्वरीत तालुक्यात प्रत्येकी दीड हजार याप्रमाणे किट वाटप करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad