Breaking

Post Top Ad

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

'कोरोना'च्या काळात शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

'कोरोनाच्या काळात शाळेच्या भिंती बोलक्या'

चंद्रपूर, दि. २ ऑगस्ट: जगभरात कोरोनाविषाणूने थैमान घातलेले आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केलेले होते. परंतु आता लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये शाळांना सुटी देण्यात आली आहे. शिक्षक मात्र आवश्यक ती खबरदारी घेऊन ई लर्निंग कँटेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी, निकालपत्र संबंधित कामकाजा करिता उपस्थित राहत आहेत. अशातच शिक्षकांनी जिल्ह्यातील अनेक शाळांच्या भिंती विविध चित्रांच्या माध्यमातून बोलक्या केलेल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) दिपेन्द्र लोखंडे तसेच जिल्ह्यातील शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी तसेच आजच्या कोरोना परिस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्यात या संदर्भातील मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रामुळे शाळेतील, परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहेतच.परंतु गावातील नागरिकांना देखील मार्गदर्शनाचा एक भाग झालेला आहे.

चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने लॉकडाऊनच्या काळामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाच्या सर्व  नियमांचे पालन करून मे आणि जून महिन्यात शाळा आकर्षक आणि भिंती बोलक्या करण्याचे काम या शाळेने केलेले आहे. यासाठी सरपंच डॉ.शरद रणदीवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्योधन वाघमारे, गट शिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, केंद्रप्रमुख रत्नमाला खोब्रागडे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव आस्वले तसेच शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून गणेश आर्ट चंद्रपूर, क्षितीज शिवकर भद्रावती, विनोद ठमके भद्रावती या चित्रकारांनी शाळेतील भिंतींचे कायापालट करत भिंती बोलक्या केलेल्या आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक नामदेव आस्वले आणि सर्व शिक्षकांचे सहविचारातून आंतरराष्ट्रीय पातळीचे विचार आणि शिक्षण देणारी शाळा आहे. हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या भिंती बोलक्या करताना हा सर्व सारासार विचार करून 'आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार रेल्वे'  हि संकल्पना भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून रंगविण्यात आली. यातून भविष्यातील संकटे, संधी, संस्कृती आणि मानव समाज परस्पर व्यवहार या घटकांवर चित्रे काढण्यात आली.

उर्वरित रंगरंगोटी करताना मुख्य तीन क्षेत्रे जसे जमीन, पाणी आणि अवकाश यांची निवड करण्यात आली. या शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे त्या सर्वांचे उपयोगाची आणि प्रत्येक घटकातून ज्ञान घेता येणारी चित्रे ऍक्रेलिक रंगांमध्ये रेखाटण्यात आली. ग्रामगीतेतील शिक्षण विषयक ओव्या रेखाटून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चरित्र घडविण्यास मदत होणार आहे. स्मार्टफार्म या चित्र रेखाटनातून भविष्यातील एज्युकेटेड स्मार्ट फार्मर दर्शविण्यात आला तर जल चित्रांमध्ये समुद्राशी संबंधित माहिती दर्शविण्यात आली. अवकाश क्षेत्रातील सूर्यमाला, अवकाश संबंधित वाहने, यान, क्षेपणास्त्रे तर जमीन क्षेत्राचा विचार करताना निसर्ग, सौंदर्य भूभाग, पाणी जीवन, ग्रामीण जीवन, शेती, वाळवंट, दुष्काळ हे सर्व घटक चित्रकाराच्या कुंचल्यातून आणि मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून पूर्ण करण्यात आले आहे.

सावली तालुक्यातील करगाव केंद्र पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी देखील लॉकडाऊनच्या काळामध्ये सरपंच धनराज लांडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नागापूरे, गट शिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी बिट पाथरीचे अनिल चव्हाण, केंद्रप्रमुख प्रमोद नान्हे यांचे विशेष सहकार्याने शाळेच्या भिंती बोलक्या झालेल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक बी.एम मेश्राम, सहाय्यक शिक्षक ए.एम मानकर, टी.डी नैताम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याकरिता व विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून शाळेच्या भिंतींवर चित्र रेखाटलेले आहे.

महापुरुषांची जीवनपट दर्शक माहिती, स्वच्छतेचे संदेश, पर्यावरण विषयक माहिती, व्यसनमुक्ती,  जलसंवर्धन बाबत चित्र, पक्षी, प्राणी यांची माहिती, नकाशे, आपलं गाव व परिसराचे थ्रीडी चित्र, गणितीय संकल्पना व संवाद ऋतुचक्र व सूर्यमाला, दिनचर्या इंग्रजी विषयी चित्रे शाळेच्या भिंतीवर काढलेले आहे. तसेच स्वच्छतागृह व किचनशेडचे चित्राद्वारे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळे शाळा सुंदर व आकर्षक झाल्यामुळे शालेय परिसरात प्रवेश करताच मन मोहून टाकते. शाळेतील या उपक्रमासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा व सर्वांगिण गुणवत्ता विकासाकरिता शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय व समस्त गावकरी मंडळींचे यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad