Breaking

Post Top Ad

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील कोण कोणते प्रकल्प भरली?

 

जिल्ह्यातील कोण कोणते प्रकल्प भरली?

जिल्ह्यातील प्रकल्प साठा आणि पूर परिस्थितीचा आरडीसींनी घेतला आढावा

यवतमाळ : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता  मुंढे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.

यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी व-हाडे म्हणाले, ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती नसली तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहे. यापूढे येणा-या पावसाचे पाणी धरणातून सोडावे लागेल. अशा परिस्थतीत महसूल, जलसंपदा, पोलिस, विद्युत कंपनी आदी विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. धरणातील पाणीपातळीचा स्तर कायम ठेवण्यासाठी यापूढे पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे फिल्डवरील यंत्रणेने अलर्ट राहावे. लोकांना वेळेत सुचना द्याव्या, असे निर्देश त्यांनी दिले.

बेंबळा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प 

जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प असून सात मध्यम प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पामध्ये पुसद तालुक्यातील पुस प्रकल्प १०० टक्के भर भरला आहे. दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्प ७८.८७  टक्के, बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा ९६.६९ टक्के भरला आहे. तसेच सात मध्यम प्रकल्पापैकी नवरगाव (ता. मारेगाव), वाघाडी (ता. घाटंजी), सायखेडा (ता. केळापूर) आणि बोरगाव (ता. यवतमाळ) हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर मध्यम प्रकल्पापैकी अडाण प्रकल्प ८१.४६ टक्के, गोकी ८८.११ टक्के आणि अधरपूस प्रकल्प ८७.४९  टक्के भरले आहे. २९ ऑगस्ट रोजी निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे ५० सें.मी. ने उघडल्यामुळे वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल आहे. त्यामुळे बाभुळगाव व कळंब तालुक्यातील १३५१ हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

यवतमाळ जिल्ह्यात १ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत ६२३ मि.मी. पाऊस पडला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत ही टक्केवारी ७८ आहे. जिल्ह्यात एकूण महसूल मंडळांची संख्या ११० आहे. यापैकी ० ते ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस दोन महसूल मंडळात (राजूर आणि शिंदोला, ता. वणी) झाला आहे. तसेच ५० ते ७५ टक्के पाऊस २५ महसूल मंडळात, ७५ ते १०० टक्के पाऊस ३६ महसूल मंडळात आणि १०० टक्क्यांच्या वर पाऊस ४७ महसूल मंडळात पडला आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत १३ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झाला आहे. यात तीन जणांचा वीज पडून तर १० जण पुरात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. यापैकी तीन जणांना प्रत्येकी प्रत्येकी चार लाखांची मदत करण्यात आली आहे. तर उर्वरीत कुटुंबांना निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याकरीता शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

तसेच पावसाळ्याच्या या तीन महिन्यात जिल्ह्यात एकूण १४ जनावरे दगावली असून यापैकी पाच जनावरांच्या मालकांना प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे एकूण १ लक्ष २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. नऊ प्रकरणे प्रलंबित आहे. तसेच पावसामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण ८९ आहे. प्रशासनाकडून मदतीची कार्यवाही सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad