Breaking

Post Top Ad

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

"कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५० बेडची व्यवस्था"; पालकमंत्री संजय राठोड

 


"कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५० बेडची व्यवस्था"; पालकमंत्री संजय राठोड

पीपीई किट घालून आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांची विचारपूस करतांना

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कोव्हीड हॉस्पीटल, जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांसाठी भरतीची व्यवस्था आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत २५० बेडची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार,महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता रुग्णांवर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सीजन पुरवठा झाला पाहिजे. कोव्हीड हॉस्पीटल व्यतिरिक्त सर्जरी वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०० ऑक्सीजन पॉईंट वाढवा. तसेच येथे ऑक्सीजन प्लाँट तयार  करता येईल का, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजनचे ५०० सिलिंडर येत होते. उद्यापासून मात्र ही संख्या दुप्पट करण्यात आली असून आता एक हजार सिलींडर येणार आहे. 


केवळ मेडीसीन विभागाच्या डॉक्टरांनीच कोरोनाबाधितांवर उपचार न करता, सर्व विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर्स, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांनी संयुक्तरित्या रुग्णांवर उपचार करावे. येथे रिक्त असलेली डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आदी पदे तातडीने भरण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील उपचाराबाबत रुग्ण समाधानी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी पीपीई किट घालून आयसोलेशन वॉर्डात भेट दिली. तसेच उपचार आणि येथे पुरविण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णांची संवाद साधला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी केली. बैठकीला महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, मेडीसीन विभागाचे डॉ. बाबा येलके, डॉ. गणेश जाधव, डॉ. रवी राठोड यांच्यासह जि.प. सभापती श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यशवंत पवार तसेच नर्स प्रभा चिंचोळकर, वनमाला राऊत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad