यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यु नव्हता. मात्र त्यानंतर मृत्युंची संख्या हळूहळू वाढत गेली. परिणामी आता तर प्रत्येक दिवशी हा आकडा समोर सरकत चालला आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्युदर रोखण्यासाठी योग्य सर्वेक्षण, वेळेत तपासणी आणि तात्काळ उपचार या त्रिसुत्रीवर गांभिर्याने काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
वणी व मारेगाव येथे कोरोना संदर्भातील उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कोव्हीड केअर सेंटरला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. पी.एस. चव्हाण, वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जवळे आदी उपस्थित होते.
जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्यांवर भर द्या, असे सांगून जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, को-मॉरबीड व्यक्ती, गरोदर माता, जुणे आजार तसेच टी.बी.सारखे आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तिची वेळत तपासणी आणि चाचणी होणे आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या रुग्णाची तात्काळ तपासणी करून वेळेत उपचार मिळतील, यासाठी दक्ष रहा. तसेच रॅपीट ॲन्टीजन टेस्ट वाढविण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीमार्फत रोज सर्वेक्षण करावे.
शहरी भागातील सर्वेक्षणाबाबत वणी नगर परिषद व मारेगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. सर्वेक्षणातून लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ आरोग्य विभागास देऊन त्यांच्यासुध्दा तपासण्या कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांनी दोन्ही तालुक्यातील कोव्हीड-१९ बाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच कोव्हीड केअर सेंटरमधील सोयीसुविधा, तपासण्या, संपर्कातील व्यक्तिंचा शोध आदींचा आढावा घेतला.
कृषी विभागाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधील (पोखरा) सर्व गावातील लाभार्थ्यांना सर्व घटकांचा लाभ देण्यासाठी त्यांचे अर्ज घेऊन मार्गदर्शन करा. किटकनाशक फवारणीबाबत तहसीलदारांनी दर सोमवारी विषबाधेबाबत आढावा बैठक घ्यावी. तसेच विषबाधा होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांना तात्काळ योग्य उपचार मिळतील, यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. वणी उपविभागात पशुधनावर ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याबाबतसुध्दा जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. मारेगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन ‘लम्पी’ आजाराने ग्रस्त असलेल्या पशुधनाची पाहणी केली.
मारेगाव येथील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी करून येथील रुग्णांची व कार्यरत असलेल्या स्टाफची विचारपूस केली. तसेच या ठिकाणी दिल्या जाणा-या सोयीसुविधा व वैद्यकीय अधिका-यांनीसुध्दा योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या. याप्रसंगी जिल्हाधिका-यांनी पीएमकिसान योजना, फवारणी व विषबाधा, पोखरा, नरेगा आदी विषयांचा आढावा घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response