Breaking

Post Top Ad

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' यामध्ये दिरंगाई नको: जिल्हाधिकारी सिंह

'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' यामध्ये दिरंगाई नको: जिल्हाधिकारी सिंह

यवतमाळ : ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी ही मोहिम अतिशय महत्वपूर्ण आहे. योग्य सर्व्हेक्षण केले तरच ही मोहिम यशस्वी होऊ शकते. त्यामुळे या मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश  जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी  प्रशासकीय यंत्रणेला दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातून तालुका व ग्रामस्तरावरील यंत्रणेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व  उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व आरोग्य यंत्रणेला सदर मोहिम गांभीर्याने राबविण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ प्रामुख्याने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी सिंह यांनी कोरोनामुळे जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या मृत्यूंवर चिंता व्यक्त करून  मृत्यूदर रोखण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. बरेचशे रुग्ण अंतिम क्षणी रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी पाहिजे तसा कालावधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. कोरोनामुळे अजिबात मृत्यु होऊ नये यासाठी ग्रामीण व नागरी भागातील सर्व्हेक्षणात कोमॉर्बीड, आयएलआय व सारीच्या रुग्णांची माहिती तसेच हाय-रिस्क व लो-रिस्क रुग्णांचे वर्गीकरण व्यवस्थित करून वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी प्राप्त करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या. हाय-रिस्क रुग्णांची माहिती अगोदर मिळाल्यास मृत्यूसंख्या निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, ठाणेदार व आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad