Breaking

Post Top Ad

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

"कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजीपूर्वक हाताळावी"; न्या.अ.श.चांदूरकर

"कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजीपूर्वक हाताळावी"; न्या.अ.श.चांदूरकर

यवतमाळ: आनंदी कौटुंबिक जीवन जगणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तथापि त्यात अडचण उद्भवल्यास कुटुंबातील आपसी वाद मिटविण्यासाठी ते न्यायालयाला धाव घेतात. मानवी दृष्टीने संवेदनशील असलेली अशी प्रकरणे हाताळतांना योग्य काळजी, खबरदारी व नैतिक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच भविष्यात पुन्हा याबाबत तक्रार उद्भावणार नाही, या आत्मविश्वासातून न्यायनिवाडा करावा, असे मत उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे तथा यवतमाळचे न्यायिक पालक न्यायमूर्ती अ.श.चांदुरकर यांनी व्यक्त केले.


यवतमाळ येथील कौटुंबिक न्यायालयाचे वेबीनारद्वारे आभासी पध्दतीने उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पु.वि.गनेडीवाला प्रमुख अतिथी म्हणून तर यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कि.रा.पेठकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

"कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजीपूर्वक हाताळावी"; न्या.अ.श.चांदूरकर

न्यायमूर्ती अ.श. चांदुरकर पुढे म्हणाले की, आभासी प्रक्रीयेद्वारे उद्घाटन करण्यात येत असलेले  विदर्भातील हे पहिलेच कौटुंबिक न्यायालय आहे. न्यायालयीन इमारतीच्या नुतणीकरणामुळे व सर्व सुविधांचे योग्य नियोजन करण्यात आल्याने ही इमारत एकमेवाद्वितीय बनली आहे. या कौटुंबिक न्यायालयाकडे इतर न्यायालयातील सुमारे ९०० प्रकरणे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे इतर न्यायालयातील भार हलका होऊन जलद न्यायदान शक्य होईल. तसेच यवतमाळ येथील अतिरिक्त न्यायालयाची मागणीदेखील कौटुंबिक न्यायालयाच्या निमित्ताने पुर्ण होणे शक्य झाले आहे.


दरम्यान यावेळी न्यायमूर्ती श्रीमती गनेडीवाला म्हणाल्या, कौटुंबिक न्यायालयात येणारे नागरिक हे कौटुंबिक कलहामुळे अगोदरच दु:खी असतात. अशा प्रकरणांकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून न बघता सामाजिक न्यायतत्वाने व प्रेमळ वागणुक द्यावी. स्वत:च्या कुटूंबाची काळजी घेतो, त्याप्रमाणे त्यांच्या समस्या सोडवाव्यात. यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कि.रा.पेठकर यांनी यवतमाळ येथे कौटूंबिक न्यायालयाची  फार जुनी मागणी आज पूर्ण होत असल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच या कौटूंबिक न्यायालयाच्या इमारतीत लहान मुलांसाठी खेळणे, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, प्रशासकीय कर्मचारी वृदांसाठी स्वतंत्र कक्ष, इंटरनेट, लॉनसह सुसज्ज संगणक कक्ष, अभिलेख कक्ष तसेच वकीलांसाठी बार रूमचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. यवतमाळ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जितेंद्र बारडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  कौटूंबिक न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस.अकाली यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.एम.आर.ए. शेख, तसेच वेबीनारच्या माध्यमातून न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad