यवतमाळ: यवतमाळ शहरातील घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात कंत्राटदाराविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. शहरातील कचरा नियमित उचलने व त्यावर योग्य प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता नियुक्त संस्था व प्रशासकीय अधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. यवतमाळ शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाबाबत जबाबदारी निश्चित करून प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
यवतमाळ नगर पालिका घनकचरा व्यवस्थापनासंबंधी विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, नगरसेवक चंदू चौधरी, गजानन इंगोले, अमोल देशमुख, विजय खडसे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची कामे व्यवस्थित होतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सध्याची पद्धत बदलवावी. एकाच ठिकाणी जबाबदारी निश्चित केली तर नियोजन चांगले होईल. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सध्या बंद असलेले सावरगाव येथील कचरा डंपींग यार्ड पुर्ववत सुरू करण्यात यावे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या पाहता नवीन डंपींग यार्डसाठी कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हैद्राबाद आणि बंगलुरूच्या धर्तीवर अत्याधुनिक मशीन घ्यावी. नगरपरिषदेने तसा प्रस्ताव सादर केल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, याबाबत त्यांनी आश्वस्त केले.
येणाऱ्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर होणार नाही, याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. कंत्राटदारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी न.प. मुख्याधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे कंत्राटदाराचे लॉगबुक, कर्मचारी हजेरीपत्रक यांची वेळोवेळी तपासणी करणे गरजचे होते. नियमांचे तसेच अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्यास सदर कंत्राट कलम ३०९ अंतर्गत रद्द करून नवीन व्यवस्था होईपर्यंत न.प. आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करावे. नवीन कंत्राटाबाबत सर्व विचार करून योग्य प्रक्रिया राबवा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
नगराध्यक्षा चौधरी म्हणाल्या, शहरातील कचरा नियमित उचलण्यात येत नाही. पंधरा-पंधरा दिवस घंटागाडी येत नाही. संकलित केलेला कचरा कोठेही फेकून देण्यात येतो. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित केल्या जात नाही, अशा अनेक तक्रारी घनकचरा कंत्राटदाराविरूद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनीसुध्दा कचऱ्या यासंदर्भातील समस्या पालकमंत्र्यांपुढे मांडल्या. जिल्हाधिकारी सिंह यांनी सावरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांसोबत प्रत्यक्ष बोलून तेथील डंपींग यार्ड बाबतच्या समस्याचे निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. तसेच नवीन डंपींग यार्डसाठी नगरपालिकेच्या सूचनेनुसार महसूल विभागाची जागा उपलब्ध करून देण्यासही काही हरकत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी शहरातील नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे नायब तहसीलदार अजय गौरकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response