जिल्हाधिकारी सिंह यांनी घेतला आढावा
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, याउद्देशाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दर आठवड्याला आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेटीला बोलावून सदर कुटुंबाची काय मागणी आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. तसेच त्यांना कोणत्या योजनेतून लाभ दिला जाऊ शकतो, याची पडताळणी जिल्हास्तरीय समितीमध्ये करण्यात येते. याअंतर्गत जिल्हाधिका-यांनी आढावा घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला विविध योजनेतून लाभ देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सोमवारी नऊ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. पात्र - अपात्र प्रकरणांमध्ये लाभ देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये निर्णय घेण्यात आला. यात संबंधित कुटुंबांचा समावेश संजय गांधी निराधार योजनेत करण्यासाठी संबंधित नायब तहसीलदार यांनी एका आठवड्याच्या आत कागदपत्रांची पुर्तता करावी. यासाठी स्वत:हून ग्रामस्तरीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. केवळ कुटुंबाची वाट पाहू नये. त्यांच्यापर्यंत पोहचून त्वरीत लाभ कसा देता येईल, याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.
तसेच दुधाळ गाई-म्हशी, शेळी आदींची मागणी आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. याबाबत पशुसंवर्धन विभागाने नियोजन करावे. यावेळी काही जणांना नरेगा अंतर्गत विहिरीची डागडूजी तर कुटुंबातील आजार असलेल्या व्यक्तिची संपूर्ण आरोग्य तपासणी व शेळींचा लाभ द्यावा. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांचा शेतमालाला वन्यप्राण्यांचा त्रास असेल तर पांढरकवडा आणि पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून तसेच वन विभागामार्फत शेताला कुंपनाचे नियोजन करावे, अशाही सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा उपविभागीय अधिकारी विवेक जान्सन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, उपजिल्हा निबंधक रमेश कटके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रामटेके, कृषी विभागाचे देवानंद खांदवे, जिल्हा अग्रणी बँकेचे सचिन नारायणे यांच्यासह संबंधित गावातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response