Breaking

Post Top Ad

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

लोकाभिमुख प्रशासनासाठी समर्पित कलेक्टर एम.देवेंदर सिंह !

लोकाभिमुख प्रशासनासाठी समर्पित कलेक्टर एम.देवेंदर सिंह !

भारतीय प्रशासकीय सेवेत काम करताना उच्च विद्याविभुषीत व्यक्तींना कशा कशा प्रसंगाना सामोरे जावे लागते हे लक्षात घेतले तर “दुरुन डोंगर साजरे” ही म्हण सार्थ होताना दिसते. भारताचे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिंन्हा हे बिहारमध्ये जिल्हाधिकारी असताना मुख्यमंत्री मायाप्रसाद सिन्हा आणि सिंचनमंत्री चंद्रशेखर सिंग यांच्यात झालेला वाद देशभर गाजला होता. यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना, ‘मी तुमच्यासारखा मंत्री होवू शकेन पण तुम्ही माझ्यासारखे कलेक्टर होवू शकणार नाही.” असे खडे बोल सुनावले होते. हे बघिलल्या नंतर कशाप्रकारचे मानापमान मूग गिळून उच्च अधिकऱ्यांना जगावे लागते हे लक्षात येईल. 

नानी पालखीवाला यांनी म्हटले आहे की, भारतीयांची जन्मजात बुद्धीमत्ता आणी जन्मसिद्ध कौश्‍ल्य इतक्या उच्च प्रकारची आहेत की, त्यांच्या बळावर भारतीय लोक आपल्या देशाला सर्वश्रेष्ठ स्थानापर्यंत पोहोचवू शकतात. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेण्याचे कारण येथील यवतमाळचे तरुण जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या कामकाजाचा आढावा घेणे हा होय माझ्या ४५ वर्षांच्या पत्रकारितेच्या करीअरमध्ये मी यशवंत भावे, डी.जी.देशपांडे, एम.रमेशकुमार, ब.ना.झामरे, ह.रा. कुळकर्णी, व्ही. गिरीराज, विकास खारगे, डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ.भुषण गगरानी, डॉ.श्रीकर परदेशी, संजय देश्‍मुख, श्रावण हर्डीकर, अश्विन मुदगल, सचिंद्र प्रताप सिंग, डॉ. राजेश देश्‍मुख, अजय गुल्हाने यांच्यासारखे खरोखरचे कर्तुत्ववान जिल्हाधिकारी आणि सीईओ अनुभवले आहेत. लालफाक झुआला आणि हीमिंगलियाना हे असे दोन कलेक्टर होते की ज्यांना मराठी येत नव्हते आणि सामान्य जनतेला इंग्रजी समजत नव्हते तेव्हा प्रशासनाची कशी फटफजीती होते हे ही अनुभवले आहे. 

लोकाभिमुख प्रशासनासाठी समर्पित कलेक्टर एम.देवेंदर सिंह !

प्रा.न.मा.जोशी जिल्हाधिकारी सिंह यांची मुलाखात घेतांना

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना दोन ठिकाणच्या जिल्हाधिकारी पदाचा आणि दोन ठिकाणही जि.प. सीईओ पदाचा अनुभव आहे. विदेशातही त्यांनी काम केले आहे. उत्कृष्ट सेवेबदल राष्ट्रीय स्तरावरील तीन सर्वोच्च पुरस्कार त्याना मिळाले आहे. काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आहे. जिल्ह्यात रुजू होताच आत्महत्याग्रस्त  जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचा समस्यांना प्राथमिकता देवून त्यांनी दहा मुदयावर एक योजना बनविली. शेतकऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, व्यावसायीक पिकांकडे वळावे यासाठी खनिकर्म निधी आणि जिल्हा विकास समितीच्या निधीमधून नियोजन केले होते. मात्र दहा मार्चला यासाठी आयोजित कार्यशाळा त्यांना ९ मार्चच्या कोरोना प्रवेशामुळे रद्द करावी लागली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन अशा ४८ सर्वोत्तम शिक्षकांची एक ब्रिगेड स्थापन करून त्याद्वारे योजना आखण्याचा त्यांचा प्लॅनदेखील महामारीने बारगळला. कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना बँकेमार्फत ७६ टक्के (१६५०) कोटी खरीप कर्जवाटप करून इतिहास निर्माण केला. 

पंतप्रधान पिक विमा योजनेतून २७१ कोटी रुपये मिळवून दिले. चार लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीत ३५ कोटी रुपये भरले होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतून ९६ हजार वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला. जिल्ह्यात यंदा सीसीआय आणि कापूस पणन महासंघाची खरेदी ६२ लाख व्क्विटंल पर्यंत नेण्यातही त्यांनी यशाचे शिखर गाठले. देशातील ७२० जिल्ह्या पैकी ८० जिल्हे कोरोनाच्या रेडझोनमध्ये होते. त्या ८० मध्ये यवतमाळचाही समावेश होता. हे लक्षात घेवून जिल्हाधिकारी सिंह यांनी पाटीपुरा सारख्या भागात सतत ३८ दिवस बैठका घेवून महामारीला थोपविले. मार्च ते जून पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नव्हता. नंतर मात्र कोरोनाचा कहर झाला. तेव्हा सर्व यंत्रणा कामी लावून लोकांना धीर दिला. जिल्ह्यात अनिल देशमुख, नितीन राऊत, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, पालकमंत्री संजय राठोड तसेच विधानसभा अध्यक्ष  नाना पटोले, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी १२ मोठ्या नेत्यांनी भेटी दिल्यात. 

सर्वांनी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या कामाची प्रशंसा केली. देवेंद्र फडणवीस यांनी तर सर्वांत्तम कार्य असे शिक्कामोर्तब केले. बँकेमार्फत मुद्रा योजनेतून अधिकतम कर्ज वाटप करून रोजगाराच्या संधी दिल्यात.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवासांठी दहा कलमी कार्यक्रम राबवून 'मिशन उभारी' अंतर्गत केलेले कार्य कायमस्वरुपी जनतेच्या लक्षात राहील. संजय गांधी पेंशन योजना असो, मागेल त्याला शेततळे, शेतविहीर, शेळी मेंढी, गाईम्हशी तारकुंपन असो की, पात्र, अपात्र अशा सर्व प्रकरणात मदत देण्याचे धोरण कृतीत आणून धाडसी निर्णय घेतले. अलीकडे जिल्हाधिकारी विरोधात  आरोग्य आणि महसूल खात्यात अचानक असंतोष भडकला की त्यांची बदली झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.पालकमंत्री संजय राठोड यांनी परिरपक्वता आणि समजूतदारपणा दाखवत दोन्ही बाजूंना शांत करीत प्रकरण अतिशय सामोपचाराने मिटविले.

या संदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोरोना काळात परिस्थिती करा किंवा मरा अशा अवस्थेला पोहोचली होती. जिल्ह्यात एकही मृत्यू होवू नये यासाठी अथक प्रयत्न करण्याचे शासनाचे आणि विरोधी पक्षनेत्यांचे आवाहन होते. त्यामुळे  २४ बाय ७ काम करावे लागत होते. सर्व अधिकारी कर्मचारी कमालीचे दबाव आणि तणावात हेाते त्यामुळे कुठेतरी विसंवाद निर्माण झाला. या त्रृटीने गैरसमज होवून वातावरण बिघडले.अखेर प्रशासनाचे काम हे टिमवर्क असते हे लक्षात घेवून आम्ही झाले गेले विसरून नव्या दमाने कामास लागलो. आता कोणतेही गैरसमज नाही. विशेषता माझ्या कडून कोणाच्याही बददल आकस नाही, द्वेषभावना नाही.एखाद दुसरा कोणीही अधिकारी, कर्मचारी गैरसमज करून घेत असेल तर तो दूर होण्याची गरज आहे. या जिल्ह्यात काम केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची  यादी जेव्हा मी पाहतो तेव्हा उच्च दर्जाचे सार्वजनिक जिवनात आदर्श निर्माण करणारे कर्तव्यदक्ष, निष्ठावंत जिल्हाधिकारी येथे येवून गेल्याचे लक्षात येते. 

प्रा.न.मा.जोशी । 8805948951

सामंजस्य आणि सहकाराने सर्व प्रश्न सुटू शकतात याची खात्री आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी जेम्स रसेल लोव्हेल यांच्या खालील ओळी सांगून जिल्हाधिकाऱ्यांच्या असलेल्या अभिमानास्पद परंपरेचा परिचय करून दिला. जेम्स रसेल ने म्हटले आहे “त्यांच्या व्यक्तीमत्ववातील जादू शोधायला लांब जायला नको, ते कमालीचे प्रेमळ होते. सबल असो वा दुर्बल असो तो कोणीही असो ते कधीही त्याच्यापासून दूर गेले नाहीत. प्रत्येक ठिकाणी ते समानतेनेच वावरले. कोणताही भिकारी त्यांना खालच्या पातळीवरचा वाटला नाही. कोणाही धनवंतापुढे ते लाचार झाले नाहीत. ते सदैव मानवाच्या साध्या पातळीवरच वावरले आणि अपरीचितालाही मित्रासारखे भासले. रसेलचे हे काव्यमय विवेचन जीवनाची दिशा बदलविणारे असल्याची प्रतिक्रीया व्यक्त करून एम. देवेंदर सिंह म्हणाले रसेलच्या भावनांची आपण कदर करण्याचा अवश्य प्रयत्न करू या. “लव्ह ऑल सर्व्ह ऑल, हेल्प एव्हर हेट नेव्हर” हे जीवनाचे तत्त्वज्ञान प्रशासकीय सेवेतही आणले पाहिजेत असे जेव्हा जिल्हाधिकारी सिंह म्हणाले तेव्हा मला ज्ञानेश्वरीतील पसायदान मधील “जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूतां परस्परे घडो मैत्र जीवांचे” हे शब्द आठवले. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा.!

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad