Breaking

Post Top Ad

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

जिल्ह्यातील अंतिम आणेवारी एवढी

जिल्ह्यातील अंतिम आणेवारी एवढी

यवतमाळ : खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी ५० च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सुट, शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश असतो.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ३१ ‍डिसेंबर २०२० रोजी जिल्ह्याची सन २०-२१ ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे २०४६ गावांची अंतिम पैसेवारी ४६ पैसे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात नमुद केले आहे.

यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३ लक्ष ९ हजार ५९२ हेक्टर आर. आहे. १६ तालुके असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ११० महसुली मंडळ, ६८२ समाविष्ट साझे आणि जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या २१५९ आहे. यापैकी २०४६ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४६ पैसे जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील उर्वरीत ११३ गावांची पैसेवारी काढण्यात आली नाही.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या २०४६ असून यात यवतमाळ तालुक्यातील १३५ गावे, कळंब तालुक्यातील १४१ गावे, बाभुळगाव तालुक्यातील १३३, आर्णी तालुक्यातील १०६, दारव्हा तालुक्यातील १४६, दिग्रस तालुक्यातील ८१, नेर तालुक्यातील १२१, पुसद तालुक्यातील १८५, उमरखेड तालुक्यातील १३६, महागाव तालुक्यातील ११३, केळापूर तालुक्यातील १३०, घाटंजी तालुक्यातील १०७, राळेगाव तालुक्यातील १३२, वणी तालुक्यातील १५५, मारेगाव तालुक्यातील १०८ आणि झरीजामणी तालुक्यातील ११७ गावांचा समावेश आहे.

तसेच संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४६ पैसे असली तरी यात यवतमाळ, नेर, केळापूर, घाटंजी, वणी आणि मारेगाव या तालुक्यांची पैसेवारी ४६ पैसे, कळंब, बाभुळगाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव आणि राळेगाव या तालुक्यांची पैसेवारी ४७ पैसे तर झरीजामणी या तालुक्याची पैसेवारी ४८ काढण्यात आली आहे. पैसेवारी न काढण्यात आलेल्या गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील १७ गावे, कळंब तालुक्यातील २ गावे, बाभुळगाव तालुक्यातील ७, आर्णी तालुक्यातील ५, दारव्हा आणि नेर तालुक्यातील 0, दिग्रस तालुक्यातील १, पुसद तालुक्यातील ४, उमरखेड तालुक्यातील २२, महागाव तालुक्यातील ३, केळापूर तालुक्यातील ११, घाटंजी तालुक्यातील १५, राळेगाव तालुक्यातील १, वणी आणि मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी ७ आणि झरीजामणी तालुक्यातील ११ गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिका-यांच्या अहवालात नमुद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad