शिवसेनेद्वारे आयोजित हदयरोग तपासणी शिबीराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद
यवतमाळ शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजकारणाचे धडे दिले. त्यामुळेच आम्ही गरजूंसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करुन डॉक्टर तसेच गरीब रुग्णांच्या मधील दुआ बनण्याचा प्रयत्न करीत असतो. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानतो असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांनी केले. ते शिवसेना यवतमाळ जिल्ह्यातर्फे यवतमाळ येथे आयोजित भव्य मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.) तसेच श्री वसंतराव नाईक शा. वै. म. तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात भव्य मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबीराचे राज्याचे वनमंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धाचे संचालक अभ्युदय मेघे, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा कालिंदीताई पवार, यवतमाळ नगर पालिकेच्या नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम जिल्हयाच्या महिला संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख,शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, सिव्हील सर्जन डॉ. तरंगतुषार वारे, एफडीसीएम चे व्यवस्थापक आय.व्ही. कोरे, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.गजेंद्र अग्रवाल, डॉ.सतिश खडसे, डॉ.चेतन राठी, डॉ संदीप चौरसिया (कार्डीओलॉजिस्ट), अभ्यागत मंडळ सदस्य डॉ. महेश चव्हाण, सौ. सागरताई पुरी, विकास क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते.
रुग्णांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
या शिबीराकरीता जिल्हयातून जवळपास एक हजार रुग्णांनी आपली नोंदणी केली आहे. गरजु रुग्णांची मोफत अँजीओग्राफी, अँजिओप्लॅस्टि आणि बायपास शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात येणार आहे. छातीमध्ये वेदना, श्वास घेतांना त्रास, छातीत भरल्या सारखे वाटणे, चालतांना धाप लागणे, पायावर सुज येणे, उच्च रक्तदाब व मधुमेह आजार असल्यास रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहे. शिबीर स्थळी हृदयरोग तपासणी, ब्लड शुगर, ई.सी.जी. व तज्ञांच्या सल्ल्यानुसार २ डी ईको व टि.एम.टी. तपासणी सुध्दा करण्यात येत आहे. ह्या तपासण्या व उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात मोठया प्रमाणात खर्च लागत असल्यामुळे प्रामुख्याने गरीब रुग्णांसाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरत आहे.आज दुपारपर्यंत ह्या शिबिरात 375 रुग्णाची तपासणी झाली होती व त्यातील 123 रुग्णांना अँजीओग्राफी करण्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे तारीख दिल्या जाणार आहे.त्याही पुढे आवश्यकता असल्यास त्या रुग्णांची मोफत अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रीया शिवसेनेच्या पुढाकारात मोफत करण्यात येणार आहे.इतर रुग्णांची तपासणी करून त्यांना उपलब्ध औषधे मोफत देण्यात आली.उद्या ह्या शिबिराचा शेवटचा दिवस असून नोंदणी केलेल्या उर्वरित रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे तसेच अभ्यागत मंडळाचे सदस्य विकास क्षीरसागर व सौ सागरताई पुरी ह्यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे तसेच सुभाषचंद्रजी बोस यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य केले. मी सुध्दा महाविद्यालयीन जीवनापासूनच बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होतो. शिवसेनेत कार्यरत असल्यामुळे बाळासाहेबांनी सेवेची शिकवण दिली. त्या शिकवणीच्या आधारावर गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य शिबीरांचे आयोजन करीत आलो आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेले रक्तदानाचे कार्य कदाचित सर्वाधिक मोठा उपक्रम ठरु शकतो. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीसरात शिवसेनेतर्फे निर्मित ‘’मातोश्री’’ प्रतीक्षालय रुग्णांचा सर्वात मोठा आधार ठरीत आहे. रूग्णांसाठी पाच रुपयांत शिवभोजन पासून माँ आरोग्य सेवा समितीच्या वतीने रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तत्पर राहीली आहे. ही रुग्णसेवा अशीच सुरु ठेवणार असल्याची ग्वाही सुध्दा याप्रसंगी पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी दिली. जिल्हा स्तराप्रमाणेच प्रत्तेक तालुका स्तरावर नोंदणी केल्यास ग्रामीण भागातील नागरीकांना त्यांच्या गावापासून रुग्णालयापर्यन्त आरोग्य सेवा देण्यास आपण तयार असल्याचे डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगीतले. संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नामुळे आता ऑटीजन, सिकलसेल तसेच विविध व्यंग उपचार सेंटर यवतमाळात सुरु झाले आहे.हृदयरोग हा गरीबांना न परवडणारा आजार आहे. ही सेवा आरोग्य शिबीराच्या माध्यमातून संजयभाऊ राठोड यांनी गरीब नागरीकांना उपलब्ध करुन दिली ही गौरवाची बाब असल्याचे नगराध्यक्षा कांचनताई चौधरी यांनी सांगीतले. जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा कालिंदीताई पवार यांनी सुध्दा आपल्या भाषणातून या आरोग्य सेवेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केले. हृदयरोगाचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत आहे. या आजारात अनेकदा लक्षणे दिसून येत नसल्यामुळे अचानक मृत्यूला सामोरे जावे लागते. वेळेत उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो. त्यामुळेच संजयभाऊ राठोड यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे पराग पिंगळे यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण शिंदे तसेच आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response