प्रा.न.मा.जोशी : ८८०५९४८९५१
१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी हा गणराज्य दिन हे दोन्ही आपले अस्मिता जपणारे महत्वाचे राष्ट्रीय सण आहेत. या दोन्ही सणांच्या दिवशी संपूर्ण देश राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेलेला असतो. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जनतेमध्ये प्रचंड उत्साह असतो आणि प्रतिकांच्या स्वरूपात ध्वजारोहण करून तिरंग्याला वंदन करीत जनता देशाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती आपली निष्ठा अर्पण करीत असते. "विजयीविश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा" म्हणत देशासाठी बलिदानाची भावना व्यक्त केली जाते. शासकीयस्तरावर होणारे कार्यक्रम आणि काही संस्था,संघटना किंवा व्यक्तींचा अपवाद वगळता अधिकतर लोक जनता दोन्ही दिवशी सुट्टीचा दिवस समजून मौज मजा करण्यासाठी दिवस घालवतात असे दुर्दैवाने चित्र आहे.या दिवसांचा खरा अर्थ देश प्रेमाची ज्योत तेवत ठेवणे हा आहे.त्या दिवशी घरोघरी गल्लोगल्ली गाव शहरात सारा देश तिरंगामयम दिसला पाहिजे.पण तसे होत नाही.
राष्ट्रीयनिष्ठा अर्पण करण्याची ही भावना जागृत करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून खामगाव येथील "मिशन ओ टू" च्या कार्यकर्त्यांनी एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. मिशन ओ टू अंतर्गत घरोघरी वृक्षारोपण करून झाडे जगवण्याचा जो उपक्रम मिशन ओ टू ने हाती घेतला आहे त्याची राज्य स्तरावर दखल घेतल्या जात आहे. अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. यासोबतच मिशन ओटू ने १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सामाजिक जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे किंवा समाजात जे उपेक्षित आहेत दुर्लक्षित आहेत अशांच्या हस्ते ध्वजारोहण करणे,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणे, महिलास - शक्तिकरणाला बळ मिळावे म्हणून महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. मिशन ओ टू चे संस्थापक नामवंत होमिओपॅथ डॉक्टर कालिदास थानवी यांनी "चॅरिटी बिगिन्स ऍट होम" म्हणीप्रमाणे आपल्या मातोश्री ऊमा थानवी यांच्या हस्ते चार वर्षापूर्वी ध्वजारोहण करून एक आदर्श निर्माण केला. पुढे अनेक नागरिकांनी हा कीत्ता गिरवत 'मातृदेवो भव' म्हणत आपल्या मातेच्या हस्ते राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक बाबूजी थानवी यांच्या हस्ते वृक्षारोपण व ध्वजारोहण करून गणराज्य दिन साजरा केला.
खामगावकरांनी दिलेली दाद देखील लक्षणीय असते. गतवर्षी घर काम करून उदरनिर्वाह चालवून मुलांचे शिक्षण करणाऱ्या सुचित्रा मोहरील या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण केले होते. विदर्भातील अनेक वृत्तपत्रांनी दखल घेत प्रोत्साहन दिले होते. ही प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी महिला कामगार किंवा घरकाम करणाऱ्या महिलांच्या हस्ते बहुतेक लोकांनी ध्वजारोहण केले.मिशन ओ टू ने या वर्षी एक अपंग दांपत्य निवडले.त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. एक हाताचा पंजा नसताना एका हाताने सारी कामे करत संसार चालवत आपल्या कुटुंबीयांचे पालण पोषण करीत मुलांचे शिक्षण करणाऱ्या या सविता अणि गणेश गिर्हे हे ते दिव्यांग दाम्पत्य.गणेश जन्मताच मूकबधीर आहेत.सविताने २००५ मध्ये यांच्याशी विवाह केला.त्यांना दोन अपत्य आहेत. गणेश गिर्हे यांचे सायकल पंक्चर दुरुस्ती चे दुकान आहे.
सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मार्गदर्शन करून उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचा त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे.आपल्या पतीच्या या कार्यात तिचे सविताचे फार मोठे योगदान आहे.नगर पालिकेच्या बांधकाम विभागात कार्यरत सर्व दिव्यांगांना शासकीय योजनांची माहिती देणे, सर्व ठिकाणावरून मदत मिळवून देणे,मुलांचे शिक्षण, लग्नकार्य या सर्व कार्यात सामाजिक मदत मिळवून देण्याच्या गिरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.पती-पत्नी दिव्यांग असूनही समाजातील विविध घटकांतील सेवेचे कार्य करतात. 'वी आर मेड फॉर इच अदर' असे सविता हसत खेळत सांगते.आपल्या हस्ते गणराज्य दिनी मिशन ओ टू ने ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊन जो सन्मान दिला त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्याजवळ शब्द नाहीत.आम्हाला राष्ट्रीय उत्सवात सहभागी करून जो आनंद दिला तो शब्दातीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मूकबधिर असलेल्या दिव्यांगांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडला. मिशन ओ टू च्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू स्थान लिव्हर चे बिपिन गांधी (व्यवस्थापक )यांची प्रमुख उपस्थिती असते. ते कारखान्यातील ध्वजारोहण आटोपून अगदी कार्यक्रमाला हजर असतात . तलवारबाजी तर राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या युवतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नितीन गांधी यांनी केलेल्या मदतीची गेल्या वर्षी वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. आमच्यासारख्या दिव्यांग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जो एक प्रेरणादायी उपक्रम कार्यकर्त्यांनी घेतला तो साऱ्या समाजाला प्रेरणादायी ठरावा.
दिव्यांग सुद्धा समाजाचे घटक असून त्यांना उपेक्षित जीवन नको आहे किंवा कोणाची सहानुभूती सुद्धा नको आहे. देवाने एखाद्या अवयवाला काढून घेतले असेल पण त्या बदल्यात बऱ्याच गोष्टी आम्हाला दिल्या आहेत .त्या आम्ही विसरू शकत नाही .आमच्यासारख्यांना दखलपात्र समजून त्यांचा सत्कार अशा राष्ट्रीय सणाच्या दिवशी करणे हे आमच्या दृष्टीने भाग्याचे लक्षण मानतो .समाजातील सर्व उपेक्षित दिव्यांग किंवा असहाय्य व्यक्तींना सुद्धा सन्मान देऊन त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणणे किंवा त्यांच्यापासून राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत घेणे हे फार मोठे काम मिशन ओ टू करीत आहे.त्यांच्याप्रती हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो असे गिर्हे दाम्पत्य म्हणाले. मिशन ओ टू ला सलाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response