आज महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक असे नामांतर झाले पण या प्रक्रियेत जेव्हा ही बँक भूविकास बँक म्हणून ओळखला जात होती तेव्हा त्या बँकेवर प्रभुत्व असलेले बाळासाहेब घुईखेडकर हे सहकार क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तित्व होते.भारत आर्थिकबाबतीत गरीब असला तरी बुद्धिमत्ता कौशल्य व धडाडीची कृती ह्याबाबतीत समृद्ध आहे.भारतीय बुद्धिवंतांची भारता बाहेरची संख्या प्रचंड आहे. हृदय जाते तेथे मेंदू जातो आणि जेथे अगत्य आहे तेथे हृदय आणि बुद्धी जात असते असे नानी पालखीवाला यांनी म्हटले आहे.बाळासाहेबांच्या बाबतीत ही बाब मोठ्या प्रमाणात लागू होते.
बाळासाहेबांनी केवळ सहकार क्षेत्रातच चांगले नाव संपादन केले नव्हते तर त्यांना पत्रकारिता आणि साहित्याची देखील आवड होती. सहकार क्षेत्रातच राहून राजकारण करणे आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवेचा वसा ऊचलणेही अद्भुत शक्ती बाळासाहेब घुईखेडकर यांच्या ठायी होती.बाळासाहेबांचे राहणीमानही अतिशय टिपिकल असायचे. त्यांचा बंद गळ्याचा कोट आणि भूविकास बँकेतील जुन्या जमान्यातील हिरव्या रंगाची ॲम्बेसिडर गाडी त्यांची ओळख होती . बँकेत शेतकरी आला आणि रिक्त हस्ते वापस गेला असे कधी घडले नाही. बाळासाहेबांना आणखी एक शौक म्हणजे आमदार प्रतापसिंग आडे यांच्याप्रमाणेच लोकांना खाऊ घालणे.अशा जेवणाच्या बैठकी सजवलेल्या होत्या.बँकेत आलेला प्रत्येक शेतकरी उपाशी जाणार नाही, याची ते काळजी घेत होते.
प्रा. न.मा.जोशी ८८०५९४८९५१
बाळासाहेबांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास आणि अनुभव दांडगा होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. असलेल्या सामाजिक जाणीववेतूनच वृत्तपत्र सुरू केले ते म्हणजे नमो महाराष्ट्र.महाराष्ट्र साप्ताहिकाचे रूपांतर आज दैनिकात झाले असून अंक काढण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव विनोद घुईखेडकर पार पडत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रच्या सोबतच मार्मिक हे सांध्य दैनिकही करण्यात आले आहे. पत्रकारितेचा हा वारसा मुलं चालवत आहेत ही फार समाधानाची बाब आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव वसंतराव घुईखेडकर यांनी तर सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे .बाळासाहेबांनी शिक्षण संस्था काढून दारव्हा येथे स्थापन केलेले मुंगसाजी महाराज महाविद्यालय ही त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची इन. जी. बी. अविस्मरणीय घटना आहे. आता या संस्थेचा कारभार चिरंजीव वसंतराव घुईखेडकर आपल्या राजकीय जीवनातील धावपळीच्या काळात वेळ काढून चांगल्यारीतीने चालवत आहेत . रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.मुंगसाजी महाराज महाविद्यालयात व्याख्यान देण्याची अनेकदा संधी मला बाळासाहेबांनी आणि तत्कालीन प्राचार्य शा बा ठाकरे यांनी दिली होती.
बाळासाहेबांच्या ठिकाणी जसा पत्रकारितेचा गुण होता तसा आणखी एक अनेकांना माहीत नसलेला गुण म्हणजे ते कवी देखील होते. त्यांच्या कविता अतिशय मर्मभेदी आहेत. शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसची यवतमाळची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती .जिल्ह्यात आमदारकीची निवडणूक ही त्यांनी लढवली होती. विजयाताई धोटे विरुद्ध बाळासाहेब असा सामना रंगला होता. त्यात बाळासाहेबांचा जरी पराभव झाला असला तरी ज्या पद्धतीने लढा दिला तो अविस्मरणीय आहे .निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर दगडफेकही झाली होती पण डोक्याला पट्टी लावून त्यांनी घरी न बसता निवडणुकीत प्रचार केला. बाळासाहेबांच्या आमदारकीचा कार्यकाल हा त्या काळातील अतिशय कठीण असा काळ होता. कारण चौफेर काँग्रेसचे साम्राज्य असताना त्या साम्राज्याला छेद देत निवडून येणे साधी गोष्ट नव्हती पण बाळासाहेब फारवर्ड ब्लॉक च्या तिकिटावर निवडून आले होते.जिल्हा भूविकास बँकअडचणीतून जात होती तेव्हा तिला वाचवण्यासाठी आणि आपल्या कर्मचारी व शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी जे कष्ट घेतले ते अभूतपूर्व आहेत. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात असलेला महत्त्वाचा गुण म्हणजे सत्तेचा उन्माद त्यांना कधीच स्पर्श करू शकला नाही.साध्या आणि भोळ्या मनाचे बाळासाहेब सर्वांवर नितांत प्रेम करणारे होते .ते आजारी होते आणि नागपूरला उपचार घेत होते तेव्हा ते माझी रोज आठवण करायचे असे मला त्यांच्या मित्रांनी सांगितले होते.
शरद पवारांना नेते मानल्यावर त्यांच्याशी बाळासाहेबांनी कधी बेइमानी केली नाही आणि जेव्हा शरद पवार व्यथा वेदनांची दखल घेत नव्हते तेव्हा ते आपला राग कवितेच्या रूपाने नमो महाराष्ट्र या आपल्या साप्ताहिकामधून व्यक्त करीत होते. कविता छापण्यापुर्वी बाळासाहेब अनेकदा माझ्याशी चर्चा करायचे.त्यांच्या ठिकाणी व्यंगचित्रकाराचीही दृष्टी होती. गाजलेली दोन व्यंगचित्रे महाराष्ट्र कधी विसरणार नाही एवढी जबरदस्त होती.एका व्यंगचित्रात जांबुवंतराव धोटे शेकोटी पेटवून बसले आहेत आणि बाजूला समिधा पडल्या आहेत त्यावर गरीब दरिद्र असे शब्द होते.म्हणजे गरीब आणि दरिद्री शोषित पीडित माणसांची आहुती देत जांबुवंतराव आपले राजकारण करीत आहे असा अर्थ त्यातून ध्वनित होत होता.दुसऱ्या एका व्यंगचित्रात जेव्हा धोटे (भाऊ)आणि जवाहरलाल दर्डा( भय्या) यांची युती झाली त्या भय्या भाऊ युती संबंधीचे व्यंग चित्र होते.जवाहरलाल दर्डा धोटे यांची दाढी करत असल्याचे ते व्यंगचित्र होते.आणि खाली मजकूर होता, 'अरे जहर लाल थोडे पाणी तर लाव'.हे व्यंगचित्र इतके गाजले होते की,वातावरण कमालीचे तप्त झाले होते. व्यंगचित्रकाराला असलेली असामान्य बुद्धिमत्ता व अचूक वेळ साधण्याची कला बाळासाहेब घुईखेडकर यांच्या जवळ होती .बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अष्टपैलू नव्हे तर अनंत पैलू आहेत. एक स्वतंत्र वेगळा ग्रंथ काढावा एवढे व्यक्तिमत्व विशाल होते. बँकेच्या परिसरात अर्धाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे .मात्र त्या पुतळ्याची पाहिजे तशी देखभाल होत नाही याचे दुःख आहे .बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी तरी जे व्रत घेतले आहे हे उरात जोपासताना बाळासाहेबांच्या गुणांचाही विचार करून एक नवा आदर्श निर्माण करण्याकडे वाटचाल केली पाहिजे. हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response