Breaking

Post Top Ad

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

संचारबंदीचे नवे नियम असे आहेत

संचारबंदीचे नवे नियम असे आहेत
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश पारीत केले आहे.यात शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र जमू नये. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसम्मेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका ई. करीता केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. तसेच मिरवणूक व रॅली काढण्यास पुढीलआदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. लग्न समारंभाकरीता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० व्यक्तींच्या मर्यादेत सामाजिक अंतराचे पालन करून रात्री १० वाजेपर्यंत परवानगी अनुज्ञेय राहील. लग्न समारंभाकरीता स्थानिक प्रशासन (तहसिलदार, मुख्याधिकारी व पोलिस विभाग) यांना माहिती देणे आवश्यक राहील.


गुरूवारी कोरोनाचा जिल्ह्यात हाहाकार

गुरूवारी चोवीस तासात जिल्ह्यात एकाचा मृत्युसह २३७ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ६६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

अंत्यविधी प्रसंगी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे यांनी त्यांचे संस्थान, मस्जीद, मंदीर, चर्च व इतर धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.जिल्ह्यातील सर्व दुकानांमध्ये व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही, याबाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत/ग्रमापंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच सर्व दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपावेतो सुरु राहतील याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील इयत्ता ५ ते ९ पर्यंत सुरु असलेल्या फक्त नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि.२८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. या कालावधीत ऑनलाईन, दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खाजगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेस कव्हर घालून असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलच्या आतमध्ये सुध्दा मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबतीत दर्शनी भागात बॅनर, फलक लावणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.

संचारबंदीचे नवे नियम असे आहेत

रेस्टारंट, हॉटेल सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजता पर्यंत सुरु ठेवण्यात मुभा देण्यात येत आहे. तसेच होम डिलेव्हरी करण्याकरीता रात्री ११.३० वाजेपर्यंत मुभा राहील. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दोन टेबलच्या मध्ये सामाजिक अंतर (६ फुट) राखणे बंधनकारक राहील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सायंकाळी ५ वाजता पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. पोलिस विभागाने गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरीता बॅरेकेटस लावण्याची कार्यवाही करावी. रिक्षा चालक, खाजगी फोर व्हिलर, बसेस यामध्ये मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.


दंडात्मक कारवाई 

चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे प्रथम आढळल्यास ५०० रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास ७५० रुपये दंड, तिसऱ्यांदा व त्यांनतर आढळल्यास १ हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई. दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनाश्यक वस्तु विक्रेते इ. आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे (दोन ग्राहकांमध्ये ६ फुट अंतर न राखणे विक्रेत्यांनी मार्कींग न करणे) याबाबत ग्राहक / व्यक्ती २०० रुपये दंड, आस्थापना मालक दुकानदार/विक्रेता २ हजार रुपये दंड,  त्यांनतर फौजदारी कारवाई करणे. किराणा / जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे याबाबत २ हजार रुपये दंड, त्यानंतर फौजदारी कारवाई, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा – २००३ अंतर्गत २०० रुपये पर्यंत दंड, पहिला गुन्हा १ हजार रुपये पर्यंत दंड किंवा २ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा ५ हजार रुपये पर्यंत दंड किंवा ५ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही राहील. उत्पादकाकरीता पहिला गुन्हा ५ हजार रुपये पर्यंत दंड‍ किंवा २ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही. दुसरा गुन्हा १० हजार रुपये पर्यंत दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा, विक्रेत्याकरीता पहिला गुन्हा १ हजार पर्यंत दंड किंवा १ वर्ष शिक्षा. दुसरा गुन्हा ३ हजार पर्यंत दंड किंवा २ वर्ष  शिक्षा.

सदर आदेशात नमुद संपूर्ण निर्देशांचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशिर व दंडात्मक कारवाई करण्यास  नगरपरिषद / नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागांचे संयुक्त पथक गठीत करावेत. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा  १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात येईल. सदर आदेश दिनांक 19 फेब्रुवारी २०२१ चे ००.०१ वा. (मध्यरात्री पासून) लागू होईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad