जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्याला दिलेले पाच हजार चाचण्यांचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत रोज पूर्ण व्हायलाच पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी सिंह पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेऊन सुचना दिल्या जात आहे. या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे तालुकास्तरीय यंत्रणेचे मुख्य काम आहे.
दरम्यान यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, बाजारपेठ तसेच विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी होणे गरजेचे आहे. ज्या आस्थापना याचे पालन करणार नाही, अशा दुकानांना परवानगी नाकारली जाईल. तसेच तालुकास्तरीय समितीने समन्वयातून काम करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रोजच्या उद्दिष्टांपेक्षा कोणत्याही तालुक्याच्या चाचण्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, बाभुळगाव आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरणात राहणारे नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे अपवादात्मक परिस्थिती वगळता यापुढे कोणालाही ही सुविधा देऊ नये. दिग्रसमध्ये सर्वांनाच गृह विलगीकरणाची सुविधा का देण्यात आली, याबाबत पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णांच्या मागे किमान 20 जणांचा शोध घेऊन चाचणी करा. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी करायचा असेल तर पुढील संपूर्ण आठवडा गांभिऱ्याने काम करा. एका आठवड्यात जिल्ह्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response