यवतमाळ : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यासाठी सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र वर्ग दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षांच्या तारखासध्दा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे वर्ग दहावी आणि बारावी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचे वेळापत्रक लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विभागातील खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस तसेच इतर प्रशिक्षण संस्था खालील अटींच्या अधीन सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था यांनी त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना आसान क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल, रुमचे निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनेतील सर्व संबंधितांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. शिक्षक व विद्यार्थी यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. तसेच बैठक व्यवस्था सामाजिक अंतर राखून करण्यात यावी व एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा.
कोविड – 19 चे अनुषंगाने केंद्र शासन, राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधित संचालकांनी संस्थेने दक्षता घ्यावी. वरील आदेशांचे जे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response