महाराष्ट्र24 । यवतमाळ : राजकीय पुढारी म्हटले की विशेषणे, बिरुदे आलीतच. ’लोकनेते’, ’लोकप्रिय’, ’जनता जनार्दनाचे कैवारी’ आदी विशेषणे आपसूकच लागतात. या लोकांनी चिकटवलेल्या पदव्याच असतात जणू! पण, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले काही औरच आहेत. ते धाडसी, कणखर अन तेवढेच संवेदनशील पण आहेत. ही विशेषणे त्यांना स्व:कर्तृत्वाने मिळाली आहेत. तर ’शेतकरी नेते’, ’बहुजन नेतृत्व’, ’ओबीसींचे नेते’ ही बिरुदे त्यांना महाराष्ट्रातील जनतेने लावलेली आहेत. तसे बघितले तर ’नाना’ या नावातच धाडसीपणा, कणखरपणा आहे. परंतु ते अतिशय संवेदनशील व हळवेदेखील आहेत. हे गुण त्यांच्या रुबाबातून नव्हे तर स्व:भावातून वेळोवेळी प्रतीत झाले आहेत.
साकोलीचे आमदार नाना भाऊ पटोले यांचे यवतमाळ जिल्ह्याशी तसे भावनिक नाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर नाराज होऊन त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यावर ते राजकारणात ’स्पेस’ शोधत होते. एव्हाना त्यांची ओळख ’ओबीसींचे नेते’ म्हणून समग्र महाराष्ट्राला झाली होती. मात्र, सर्वच पक्षात बहुजनांचे नेते सुमार असल्याने या नेतेपदाला फारशे वलय नव्हते. पण, यवतमाळ जिल्ह्याने त्यांना खरी ओळख दिली. त्यांच्या नावासमोर ’शेतकरी नेते’ ही बिरुदावली लावली. याच बिरूदावलीमुळे पुढे ते किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, विधानसभा अध्यक्ष झाले अन् आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचेही अध्यक्ष आहेत. या मागची कहाणीही तेवढीच रंजक आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी जगभर कुप्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी नैसर्गिक संकटामुळे तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. घाटंजी तालुक्यातील एका शेतकर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्यावेळी नाना पटोले यांनी प्रथमच जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी त्या शेतकर्याच्या घरी जाऊन व्यक्तिगत 50 हजार रुपयांची मदतही केली. त्या शेतकर्याच्या घरची दैना बघून नाना भाऊंच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याशिवाय राहिले नाही. ही संवेदनशीलता तेथे उपस्थित लोकांनी अनुभवली. 2017-18 मध्ये कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे जिल्ह्यातील 22 शेतकर्यांचे मृत्यू झाले होते. विषबाधेने एक एक शेतकरी बळी जात होता व शेकडो शेतकरी रुग्णालयात उपचार घेत होते. तरीदेखील जिल्ह्यातील नेत्यांना जाग आली नव्हती. एकमेव माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यासाठी आंदोलने केली. त्यांचे आंदोलन इतके शिगेला पोहोचले होते की, खुद्द राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना यवतमाळला यावे लागले होते.
राज्याच्या तत्कालीन कृषिमंत्र्यांपासून मंत्रिमंडळातील किमान 20 मंत्र्यांचे दौरे त्यावेळी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झाले होते. देवानंद पवार यांनी हा प्रश्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर नेला. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार खळबळून जागे झाले. राज्याच्या विधानसभेत व लोकसभेतही हा प्रश्न त्यावेळी गाजला. दरम्यान, देवानंद पवार यांना तत्कालीन सरकारने छळणे सुरू केले. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, न घाबरता त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी नाना भाऊंना गळ घातली. शेतकर्यांविषयी आस्था असल्याने नाना भाऊंनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे आंदोलनाला बळ आले. कीटकनाशक विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून नाना भाऊंनी ट्रकभर तांदूळ पाठविला. ऐन दिवाळीपूर्वी त्या 22 कुटुंबांना तांदूळ, किराणा व शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचे काम देवानंद पवार यांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडले. आपला मतदारसंघ नसतानाही नाना भाऊंनी यवतमाळ जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना केलेली ही मदत लाखमोलाची होती. त्यातून त्यांची शेतकर्यांविषयीची तळमळ व संवेदनशीलता अनुभवाला मिळाली. जेव्हा जिल्ह्यातील नेत्यांनी या प्रश्नाकडे ढुंकूनही बघितले नाही, तेव्हा नाना भाऊ समोर आले. त्यानंतर गुलाबी बोंडअळीचे कपाशीवर आलेले संकट व त्यावर झालेले आंदोलनही देवानंद पवार यांनी केले. यातही नाना भाऊ मार्गदर्शक म्हणून पुढेच होते. गुलाबी बोंडअळीची दखल तर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी नेर तालुक्यात प्रत्यक्ष कपाशीच्या शेतात भेट दिली. शेतकर्यांसाठी जिल्ह्यात झालेली ही काही आंदोलने नाना पटोले यांच्या राजकीय प्रवासात मैलाचा दगड ठरली. आता नाना पटोले हे नाना भाऊ पटोले झाले. ते केवळ ’ओबीसीं’चे नव्हे तर शेतकर्यांचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.
यवतमाळातील शेतकरी आंदोलनाची धग इतकी मोठी होती की, तिची आस संसदेपर्यंत पोहोचली. या आंदोलनाची माहिती काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचली. कधीकाळी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष सोडणारे नाना पटोले यांच्यातील शेतकर्याबद्दलची तळमळ पाहून नाना भाऊंना दिल्लीत बोलावणे झाले. काँग्रेसने किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊन एका शेतकरीपुत्राचा सन्मान केला. शेतकरी नेता म्हणून यवतमाळ जिल्ह्याने नाना भाऊंची ओळख घट्ट केली, त्यावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. एका संवेदनशील नेत्याचा सन्मान केला. किसान काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर नाना भाऊंनी आपले लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर केंद्रित केले. किसान काँग्रेसची बांधणी केली. देवानंद पवार यांना विदर्भ किसान काँग्रेसचे अध्यक्ष केले. 2019मध्ये नाना भाऊ नागपुरातून लोकसभा निवडणूक लढले. चार वेळा आमदार व एकवेळा खासदार राहिलेले नाना भाऊ लोकसभा निवडणूक हरल्यावर थांबले नाहीत. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते साकोलीतून आमदारकी लढले. आमदार झाले अन् विधानसभेचे अध्यक्ष पण. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवाला सुनावलेले खडेबोल इतिहास घडवून गेले.
लोकशाहीत नोकरशाही व लोकप्रतिनिधींचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना असली तरी नेतृत्वातील कणखरपणा, धाडसीपणा काय असतो, हे सिद्ध करणारी आहे. प्रथमच संपूर्ण देशाने एका नेतृत्वातील असा धाडसीपणा अनुभवला होता. त्यानंतर नाना भाऊंनी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कृषी न्यायालये व्हावीत, यासाठी स्वतःच विधानसभेत ठराव मांडला, तसा प्रस्ताव केंद्र सरकारलाही पाठविला. ही एका शेतकरीपुत्राची शेतकरीनिष्ठा होय! गेल्या वर्षी राज्यातील 69 मुलांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यात अनेक मुले राज्यातील सामान्य शेतकरी, गरीब कुटुंबातील होती. या मुलांचा सन्मान व्हावा व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा मंत्रालयात गौरव करण्याची संकल्पना देवानंद पवार यांनी बोलून दाखवली. नाना भाऊंना ती खूप आवडली. त्यांनी लागलीच होकार देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील सर्व ’आय. ए. एस’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचे ठरले.
देशातील ही पहिली घटना आहे की, विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. नाना कणखर वाटतात तसे मुळात ते नाहीत. ते फार संवेदनशील व हळव्या मनाचे आहेत. त्यांना लोकांच्या भावना, प्रश्न कळतात. दुःख, वेदना पाहून त्यांचे संवेदनशील मन विद्रोह करून उठते. ते कणखर भूमिका घेतात. मग त्यांना परिणामाची पर्वा नसते. न्यायासाठी संघर्ष हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यांना ग्रामीण जीवन, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळेच ते शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावून जातात. मोहाफुलाचा प्रश्न याच जाणिवेतून त्यांनी सोडविला. तर यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाची व्यवस्थाच त्यांनी करून दिली. तिच्या घरी भेट देऊन तिला धीर दिला. त्यांना शेतकरीच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुजन समाज खुनावतोय.
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द झाल्याने ते कमालीचे व्यथित झाले. थेट त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली. अध्यक्ष असताना त्यांनी ओबीसींच्या जनगणनेचा ठराव मांडला, तो केंद्र सरकारकडे पाठविला. याबाबत त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे. पदोन्नतीत मागासवर्गीयांचे आरक्षण कायम राहावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नाना भाऊ अभ्यासू आहेत. इतरांच्या सूचनांचा ते नेहमी आदर करतात. लोकशाहीवर त्यांचा विश्वास असून संविधानावर अतूट श्रद्धा आहे. उज्ज्वल भारत त्यांचे स्वप्न आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या नाना भाऊंचा 5 जून रोजी वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. पण, यवतमाळात तो जणूकाही आपल्याच जिल्ह्याचे नेते आहेत, अशा अविर्भावात साजरा होत आहे. प्रथमच बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला हा बहुमान मिळाला आहे. अशा कर्तृत्ववान, धैर्यशील व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवशी कोटी कोटी शुभेच्छा!
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुभाष धवसे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
उत्तर द्याहटवा