यवतमाळ : सद्यपरिस्थित यवतमाळ तालुक्यात कपाशी पिकावर कोणत्याही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला नसला तरीही 50 ते 55 दिवसाच्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तरी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून नत्र युक्त खतांचा अवाजवी वापर टाळावा, जेणेकरून पिकाची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही व पिक दाटणार नाही याची काळजी घ्यावी. बांधावरील तसेच शेताच्या सभोवताली असणाऱ्या किटकाच्या पर्यायी खाद्य वनस्पती (अंबाडी, रानभेंडी) नष्ट कराव्या. शेतात पक्षी थांबे उभारावेत.
ज्यामुळे पक्षी बसून अळ्या/किडी टिपून खातील. कपाशीवरील बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी कापूस जिनिंगच्या मिल व मार्केट यार्डच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे (प्रती १० मीटर अंतरावर १ कामगंध सापळा ) तसेच किमान ४ ते ५ प्रकाश सापळे लावून आकर्षित झालेले किटक नष्ट करावे.
फुले व बोंडे लागण्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने नर पतंग जेरबंद करण्यासाठी प्रती एकर १० ते १२ कामगंध सापळे लावावे व सापळ्यात अडकलेले पतंग वेळेच्या वेळी नष्ट करावेत.
लिंग प्रलोभने कालबाह्य झाल्यास बदलावीत. या सापळ्यामध्ये २ ते ३ दिवस सतत ७ ते ८ पतंग आढळून आल्यास त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतात प्रकाश सापळे हेक्टरी ४ ते ५ लावावेत, बोंडअळीग्रस्त फुले/डोमकळ्या आढळल्यास अशी फुले त्वरित तोडून अळीसह नष्ट करावे.
बोंडअळीची अंडी किवा प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसू लागताच ट्रायकोग्रामा ब्याक्त्री किंवा ट्रायकोग्रामा चीलोणीस या परोपजीवी किटकाची १ ते १.५ लाख अंडी या प्रमाणात दर आठवड्याने ३ ते ६ वेळा कपाशीच्या शेतात सोडावी.
या कालावधीमध्ये कोणतेही किटकनाशक फवारू नये. गुलाबी बोंडअळीचा प्राथमिक स्वरुपाचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ % या वनस्पती जन्य किटकनाशकाची किंवा अझाडीरेक्तीन ३०० पीपीएम ५० ते १०० मिली किंवा अझाडीरेक्तीन १५०० पीपीएम @ ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बिव्हेरिया बेसियाना १.१५% विद्राव्य भुकटी ५० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून शेतात आद्रता असताना फवारणी करावी. रासायनिक किटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. पांढरी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकांचा वापर टाळावा.
केंद्रीय किटकनाशक मंडळ फरीदाबादद्वारा शिफारशीत कोणत्याही एका किटकनाशकाची आलटून पालटून आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकांचा वापर ऑक्टोबर महिन्यापूर्वी करू नये.
ऑगस्ट महिना- निंबोळी अर्क ५%किंवा अझाडीरेकटीन ३०० पीपीएम हे किटकनाशक ५० ते १०० मिली किंवा अझाडीरेकटीन १५०० पीपीएम ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% इसी २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात किंवा वरील पैकी कोणतेही एक लेबल क्लेम असलेले किटकनाशक.(सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकाव्यतिरिक्त)
सप्टेबर महिना- क्लोरपायरीफॉस ५०% इ सी १२ ते २० मिली किंवा क्वीनॉलफॉस २० एएफ २३ ते २५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी २० ग्राम प्रति १० लिटर पाणी किंवा वरील पैकी कोणतेही एक लेबल क्लेम
असलेले किटकनाशक.(सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकाव्यतिरिक्त)
ऑक्टोबर महिना- क्लोरपायरीफॉस ५०% इ सी १२ ते २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी २० ग्राम प्रति १० लिटर पाणी किंवा वरील,पैकी कोणतेही एक लेबल क्लेम असलेले किटकनाशक.
नोव्हेंबर महिना-फेनव्हलरेट २० इसी ५.५ मिली किंवा सायपरमेथ्रीन १० ए सी ७.५ मिली प्रति १० लिटर पाणी किंवा वरील पैकी कोणतेही एक लेबल क्लेम असलेले किटकनाशक.
उपरोक्त किटकनाशकाच्या मात्रा केंद्रीय किटकनाशक मंडळ, फरीदाबादद्वारा शिफारशीनुसार आहेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच किटकनाशकांची फवारणी शिफारशीत शेवटचा पर्याय म्हणून करावी. फवारणी करताना अंगरक्षक कपडे, चष्मा, हातमौजे, टोपी, मास्क वापरूनच फवारणी करावी.
एकाच किटकनाशकाची वारंवार फवारणी करणे टाळावे. पुढील फवारणी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी. किटकनाशकामध्ये इतर कोणतेही रसायन मिसळून फवारणी करू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response